साहित्य:- तीन वाट्या बासमती तांदूळ, नऊ वाट्या पाणी, दोन मोठे कांदे, दोन मोठे टॉमेटो, दोन लहान चमचे आलं-लसूण पेस्ट, दोन मोठे चमचे तेल, एक लहान चमचा राई, अर्धा वाटी मटार, पाव वाटी गाजराचे लांब तुकडे, अर्धा वाटी श्रावण घेवड्याचे लांब तुकडे , अर्धा वाटी फ्लॉवरचे तुकडे , पाव वाटी भोपळी मिरचीचे चौकोनी तुकडे, एक मोठा चमचा लाल मिरची पावडर , एक लहान चमचा गरम मसाला पावडर, दोन लहान चमचे पावभाजी मसाला, दोन लहान चमचे साखर, चवीपुरते मीठ, कोथिंबीर
कृती:- बासमती तांदूळ अर्धा तास भिजत ठेवावा. गॅसवर पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे. पाणी गरम झाले कि त्यामध्ये एक लहान चमचा मीठ व भिजवलेला बासमती तांदूळ शिजवण्याकरीता टाकावा. तांदूळ शिजला की, जास्तीचे पाणी जाण्याकरिता जाळीमध्ये निथळत ठेवावा. मटार, कापलेले गाजर, श्रावण घेवडा, फ्लाँवर शिजवून घ्यावे. कांदे-टॉमेटो बारीक चिरावेत. गॅसवर फ्रायींग पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकावे, तेल तापले की त्यामध्ये राई फोडून घ्यावी. आलं-लसूण पेस्ट टाकावी आणि दोन मिनीटे हलवावे व त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंग येईपर्यंत परतावा. मग त्यामध्ये टॉमेटो घालून दहा मिनीटे पुन्हा परतवून घ्यावे. कांदा-टॉमेटो एकजीव झाले आणि त्याला तेल सुटले की त्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, पाव भाजी मसाला, साखर घालावी. शिजवलेल्या सर्व भाज्या व चवीपुरते मीठ घालावे व छान परतवून घ्यावे. शेवटी शिजवलेला बासमती तांदूळ मिक्स करावा व छान दहा मिनीटे परतवून घ्यावा म्हणजे सर्व मसाला भाताबरोबर एकजीव होईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply