आजचा विषय थालीपीठ भाग एक

भाजणीचे थालीपीठ सगळ्यांनाच आवडते. पटकन होते व करायला सोपे म्हणून महिला वर्गाचीही याला पसंती असते. गरमागरम थालीपीठ व त्यावर लोण्याचा गोळा ठेवला, की फक्कड बेत जमतो. थालीपीठ भाजणी किंवा एकत्रित भाकरीच्या पीठात किसलेला दुधी एकत्र करून थालीपीठं केल्यास तो एक पोषक व हलका-फुलका नाश्त्याचा पर्याय ठरू शकतो. उपवासाच्या दिवसातही शिंगाडा, राजगिरा किंवा वरीच्या पिठापासून खास उपवासाची थालिपीठं बनवता येऊ शकतात. भाजणीचं थालीपीठ, वडय़ांव्यतिरिक्त मोकळ भाजणी असाही एक खाद्यप्रकार केला जातो. साधारणत: वाटली डाळीसारखा हा प्रकार भरपूर नारळ घालून खायचा.
काही कृती थालीपीठाच्या
संजीव वेलणकर पुणे.

थालीपिठाच्या भाजणीचे प्रमाण
चार वाट्या बाजरी, दोन वाट्या ज्वारी, एक वाटी उडदाची डाळ, एक वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी धने, दोन मोठे चमचे जिरे.
ही सर्व धान्ये व धने-जिरे सर्व भाजून घेऊन एकत्र दळून भाजणीचे पीठ तयार करून घट्ट बंद डब्यात भरून ठेवावे. (वरील प्रमाणात थोडे कमी-अधिक करण्यास हरकत नाही.) हे भाजणीचे पीठ अनेक दिवस टिकते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

भाजणीचे थालीपीठ
जेवढी थालीपिठे करावयाची असतील त्या प्रमाणात भाजणी घ्यावी.
त्यात मीठ, हिंग, हळद, तिखट, थोडे तेल, बारीक चिरलेला कांदा, थोडे तीळ व पाणी घालून छान मळून घ्यावे. साध्या तव्यावर अथवा नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल घालून त्यावर थालीपीठ थापावे. (किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर थापून मग तव्यावर घालावे.) थापलेल्या थालीपिठावर बोटाने चार-पाच भोके पाडून त्यात तेल सोडावे. मंदाग्नीवर दोन्ही बाजूंनी थालीपीठ छान भाजून घ्यावे व गरमागरम खायला द्यावे. या भाजणीच्या थालीपिठात मळण्यापूर्वी काही जण थोडा काळा मसाला घालतात. आवडल्यास कोथिंबीरही बारीक चिरून घालावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मिश्र पिठांचे थालीपीठ
साहित्य :- एक वाटी बाजरीचे वा ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, एक चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, हिंग, मीठ, हळद, तिखट चवीनुसार, एक मोठा कांदा बारीक चिरून, थोडे तीळ, थोडी कोथिंबीर बारीक चिरून, तेल.
कृती :- सर्व पिठे व मसाल्याचे जिन्नस, कांदा, कोथिंबीर, तीळ थोडे तेल व पाणी घालून मळून घ्यावे व थालीपिठे बनवावीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

भाज्यांचे थालीपीठ
भाजणीत अथवा मिश्र पिठांमध्ये बारीक चिरलेली मेथी अथवा कांद्याची पात, किसलेले गाजर वा मुळा वा दुधी भोपळा असे काहीही आपल्या आवडीप्रमाणे मिसळून व मीठ, तिखट, हिंग, हळद, धने-जिरेपूड, तेल सर्व घालून मळून थालीपिठे बनवावीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

वांग्याचे थालीपीठ
साहित्य :- थालीपीठ भाजणी दोन वाट्या, एक भरताचे मोठे वांगे भाजून, एक चमचा धने-जिरेपूड, एक चमचा आले-लसूण-हिरवी मिरची वाटून, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, मीठ, तेल.
कृती :- भरताचे मोठे वांगे भाजून साल काढून कुस्करून घ्यावे. त्यात इतर सर्व जिन्नस व भाजणी घालावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून मळून घ्यावे व लहान-लहान थालीपिठे लावावीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

तांदळाचे थालीपीठ
साहित्य :- तांदळाचे पीठ, जिरेपूड, मीठ, हिरवी मिरची बारीक चिरून व कोथिंबीर बारीक चिरून, तेल.
कृती :- तांदळाच्या पिठात वरील सर्व जिन्नस घालून व थोडे तेल घालून पाण्याने मळून घ्यावे.
नेहमीप्रमाणे थालीपिठे लावावीत. ही थालीपिठे अत्यंत कुरकुरीत बनतात. गरम असतानाच खायला द्यावीत. तांदळाच्या पिठाऐवजी तांदळाचा रवा घेऊनही थालीपीठ बनवतात. इतर साहित्यासोबत त्यात थोडे खोवलेले खोबरे घालून ही थालीपिठे बनवतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

स्वीटकॉर्न पालक थालीपीठ
साहित्य :- दोन वाट्या स्वीटकॉर्नचे शिजवलेले दाणे, आठ-दहा पालकाची पाने, सात-आठ लसूण पाकळ्या, आल्याचा लहान तुकडा, दोन-तीन हिरव्या मिरच्या (वाटून पेस्ट करून घेणे), तांदळाचे पीठ, मीठ, तेल.
कृती :- स्वीटकॉर्नचे शिजवलेले दाणे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावेत. पालकाची पाने आधण पाण्यात एक मिनिट ठेवून बाहेर काढावीत. सुकवून बारीक चिरून स्वीटकॉर्नमध्ये मिसळावीत.
आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट एक चमचा व चवीनुसार मीठ घालावे. या मिश्रणात मावेल त्याप्रमाणे तांदळाचे पीठ घालून व थोडे तेल घालून छान मळून घ्यावे व नेहमीप्रमाणे थालीपिठे लावावीत.
हे वेगळ्या चवीचे थालीपीठ मस्त लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*