लाल भोपळ्याचे गोड थालीपीठ
साहित्य :- दोन वाट्या लाल भोपळ्याचा कीस, एक वाटी गूळ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, आवश्यकतेप्रमाणे कणीक, चिमूटभर मीठ, तेल, पाव चमचा खाण्याचा सोडा.
कृती :- भोपळ्याचा कीस व गूळ शिजवून घ्यावे.
त्यात तांदळाचे पीठ, चिमूटभर मीठ, चमचाभर तेल व पाव चमचा खाण्याचा सोडा मिसळावा.
त्यानंतर हे मिश्रण गार झाल्यावर त्यात मावेल इतकी कणीक घालून मळून घ्यावे व थालीपिठे लावावीत.
अगदी मंद विस्तवावर भाजावे. थालीपीठ थोडे जाडच ठेवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कणकेचे गोड थालीपीठ
साहित्य :- दोन वाट्या जाडसर कणीक, पाव वाटी तूप, पाऊण वाटी पिठीसाखर, चिमूटभर मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा, थोडी वेलदोड्याची पूड.
कृती :- वरील सर्व जिन्नस एकत्र करून व आवश्यकतेनुसार पाणी घालून मळून घ्यावे. तव्यावर तूप वा तेल घालून त्यावर थालीपिठे लावावीत. मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजावे. हे थालीपीठ कुरकुरीत बनते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
थालीपीठ बर्गर
साहित्य :- थालीपिठाची भाजणी, तिखट, मीठ, हिंग, थोडा ओवा, तेल, काकडी, टोमॅटो, कांदा, सॅलडची पाने, चीज स्लाइस, टोमॅटो सॉस, उकडलेला बटाटा.
कृती :- थालीपिठाच्या भाजणीत मीठ, हिंग, थोडेसेच तिखट, थोडा ओवा व तेल घालून मळून घ्यावे.
काकडी, टोमॅटो, कांदा यांच्या गोल चकत्या करून घ्याव्यात. उकडलेल्या बटाट्याचा कुस्करून लगदा करावा. त्यात मीठ, मिरपूड घालावे. सॅलडची पाने स्वच्छ धुऊन पुसून घ्यावीत. थालीपीठ भाजणीची पुरीच्या आकाराची छोटी-छोटी थालीपिठे बनवून घ्यावीत. बशीत एक गोल छोटे थालीपीठ ठेवून त्याला टोमॅटो सॉस लावावा. त्यावर काकडीची चकती ठेवावी. त्यावर थोड्या उकडलेल्या बटाट्याच्या लगद्याला गोलाकार आकार देऊन ठेवावे. त्यावर दुसरे गोल थालीपीठ. त्यावर पुन्हा टोमॅटो सॉस, कांदा, टोमॅटो चकती, सॅलडच्या पानाचा तुकडा व त्यावर चीज स्लाइस ठेवावा व त्यावर तिसरे छोटे गोल थालीपीठ ठेवावे. त्यावर थोडे किसलेले चीज भुरभुरावे. हे बर्गर मायक्रोवेव्हमध्ये अर्धे मिनिट ठेवून गरम करून खाण्यास द्यावे. वेगळ्या चवीचा हा बर्गर मुलांना नक्कीच आवडेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
थालीपीठ पिझा
साहित्य :- थालीपीठ भाजणी, मीठ, तिखट, हिंग, ओवा, तेल, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची (सर्व बारीक चिरून), स्वीटकॉर्नचे दाणे, टोमॅटो सॉस, चीज.
कृती :- थालीपिठाची भाजणी घेऊन त्यात आवश्यकतेनुसार मीठ, थोडे तिखट, हिंग, थोडा ओवा व तेल घालून व थोडे पाणी घालून मळून घ्यावे व नेहमीप्रमाणे मोठ्या आकाराची थालीपिठे बनवावीत.
प्रत्येक थालीपिठावर टोमॅटो सॉस लावावा. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची व उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणे पसरून घालावेत.
त्यावर किंचित मीठ, मिरपूड भुरभुरून घालावी व भरपूर किसलेले चीज घालावे.
ओव्हनमध्ये दहा मिनिटे भाजून घ्यावे. वरचे चीज वितळले, की झाले समजावे. वेगळ्या चवीचा हा पिझा मस्त लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ
भाजणी करण्याची कृती :- राजगिरा, साबूदाणा व वऱ्याचे तांदूळ समप्रमाणात घेऊन भाजावेत. त्यात थोडे जिरे घालावेत व सर्व एकत्र दळून पीठ करावे. ही भाजणी बरेच दिवस टिकते.
साहित्य :- जितकी थालीपिठे बनवायची त्याप्रमाणे भाजणी घ्यावी. एक वाटी भाजणी असल्यास अर्धी वाटी दाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, बारीक वाटलेली वा चिरलेली मिरची, थोडे जिरे, कोथिंबीर, तूप.
कृती :- भाजणी, दाण्याचे कूट, मीठ, मिरची (अथवा लाल तिखट), जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर- सर्व एकत्र करून थोडे पाणी घालून मळून घ्यावे. तव्यावर तूप सोडून थालीपीठ लावावे. मंद विस्तवावर भाजावे.
याचप्रमाणे शिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ बनवता येते. भाजणीऐवजी शिंगाड्याचे पीठ घ्यावे. बाकी सर्व कृती वरीलप्रमाणे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
उपवासासाठी साबूदाण्याचे थालीपीठ
साहित्य :- दोन वाट्या साबूदाणा, दोन उकडलेले बटाटे, एक वाटी दाण्याचे कूट, बारीक मीठ, जिरेपूड, बारीक चिरलेल्या चार हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, चमचाभर लिंबाचा रस, तूप अथवा रिफाइंड शेंगदाणा तेल.
कृती :- साबूदाणा चार तास भिजवून घ्यावा. उकडलेले बटाटे साल काढून कुस्करून मऊ झालेल्या साबूदाण्यात मिसळावेत. त्यात दाण्याचे बारीक कूट, मीठ, मिरची, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबाचा रस घालून सर्व मळून घ्यावे. मिरचीऐवजी लाल तिखट पूडही घालता येईल. प्लॅस्टिकच्या कागदावर थालीपीठ थापून तापलेल्या तव्यावर तूप सोडून त्यावर घालावे. मध्ये भोक पाडून त्यातही तूप वा तेल सोडावे. मंद विस्तवावर दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत भाजून घ्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply