आजचा विषय मशरूम

मशरूमला ‘व्हेजिटेरियन्स मीट’ असं म्हटलं जातं. मशरूम हा शाकाहारी की मांसाहारी पदार्थ आहे याबाबत नेहमी चर्चा केली जाते. मात्र मशरूम हा शाकाहारी पदार्थ आहे. मटणाप्रमाणे चव असलेले मशरूम खाण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे पावसाळा येण्याची वाट पाहावी लागत नाही. कारण वर्षभर मशरूम मार्केटमध्ये उपलब्ध असतात. ते विकत आणले तर ते साफ करण्यावरून कटकट होणारच असते. मशरूम शिजायला फार तर पाच मिनिटं लागतील, पण साफ करणं म्हणजे दिव्यच. त्यामुळे अनेकदा मशरूम हे हॉटेल किंवा रेस्तराँमध्येच खाल्ले जातात. आपल्याकडे इंग्रजीत ‘मशरूम’ किंवा मराठीत ‘कुत्र्याची छत्री’ आणि हिंदीत कुकुरमुत्ता असं म्हटलं जातं. याची लागवड विशेषत: जमिनीवर किंवा अन्न स्रेतावर एका बुरशीच्या रूपाने होत असते. या मशरूमची वाढ एका रात्रीतही वेगाने होऊ शकते. भारतात मशरूमचा अधिक वापर केला जात नाही. पण हल्ली चायनिजसारख्या पदार्थामध्ये याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे हल्ली मशरूमची लोकप्रियता वाढलेली दिसतेय. मशरूमचे अनेक प्रकार असून भारतात प्रामुख्याने तपकिरी मशरूम, पांढरा मशरूम असे प्रकार असून त्याला टेबल मशरूम किंवा इटालियन मशरूम किंवा पांढरं बटण म्हणूनही प्रसिद्ध आहे. याचा आकार छत्रीप्रमाणे असून त्यावर काळ्या रंगांचे ठिपके दिसतात. खाण्यास योग्य जातींपैकी बटन अळिंबी, धिंगरी अळिंबी, भाताच्या काडावरील अळिंबी या तीन ते चार जातींची व्यापारी तत्त्वावर लागवड करता येते. त्यातील धिंगरी अळिंबीच्या जातीपैकी महाराष्ट्रात प्ल्युरोट्‌स साजोर काजू, प्ल्युरोट्‌स फ्लोरिडा, प्ल्युरोट्‌स डवोस, प्ल्युरोट्‌स प्लॅबीलॅट्‌स, हिपसिझायगस अलमॅरीस या जातीचे उत्पादन घेतले जाते. अळिंबी या हरितद्रव्यविरहित असल्यामुळे अन्नासाठी तिला इतर सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून राहावे लागते. अनेक ठिकाणी हे मशरूम सुकवून बाजारात विकले जातात. यापासून लोणचं, सूप पावडर, मुरंबा, बिस्किटं, चॉकेलट आदी पदार्थ केले जातात. घरच्याघरी अगदी सहजपणे मशरूमच्या अनेक रेसिपी बनवता येतात. सॅलड पासून ते अगदी चमचमीत डिशपर्यंत…
मशरूम अतिशय पौष्टिक असून याचे काही औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.

» यात प्रोटिनचा भरपूर समावेश असतो. » स्तनांचा कॅन्सर होण्यापासून बचाव होतो. » अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. » खनिजांचा भरपूर साठा असल्याने यकृत निरोगी ठेवण्यास मदत होते. » यात व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि फायबरचं प्रमाण अधिक असल्याने हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. » याच्या सेवनाने चयापचय शक्ती सुधारते. » यात कॅलरीजचं प्रमाण कमी असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. असं असलं तरी मशरूम खाताना थोडीशी खबरदारी बाळगावी लागते. कारण हे अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराला धोकादायकही ठरू शकतं.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

काही मशरूमचे पदार्थ

मशरूम सॅलड
एक वाटी मशरूम स्वच्छ करून घ्या. घेवडा आणि गाजर बारीक चिरून वाफवून घ्या. एक सिमला मिरची चिरून घ्या. दोन लसणाच्या पाकळ्या वाटून एक चमचा गरम तेलात घाला. मीठ आणि मिरपूड घाला आणि एकत्र केलं की झालं सॅलड तयार.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मशरूम मसाला
साहित्य:- पाव किलो मशरूम, पाव किलो मटार, तेल आणि थोडं लोणी, फोडणीसाठी जिरं, दोन कांदे, दोन चमचे आलं, दोन चमचे लसणाची पेस्ट, एक चमचा तिखट, दोन चमचे धनेपूड, एक चमचा कसूरी मेथी, दोन टोमॅटो, ताजं क्रीम आणि कोथंबीर.
कृती:-तेल आणि लोणी एकत्र तापवा. त्याला जिऱ्याची फोडणी द्या. कांदे बारीक चिरून परता. त्यात आलं, लसूण पेस्ट, तिखट, धने टाकून परतून घ्या. बारीक चिरलेले टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. कसूरी मेथी थोडी तव्यावर गरम करून मसल्यात टाका. त्यात मटार, मशरूम घाला. पाणी घालून शिजवून घ्या. मशरूम लवकर शिजतात. त्यामानाने मटारला वेळ लागतो. त्यानुसार शिजवा. फ्रेश क्रीम घालून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीसह वाढा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मशरूम करी
साहित्य:-एक वाटी मटार, पाव किलो मशरूम, तीन कांदे, टोमॅटोचा रस अर्धा कप, एक चमचा आलं-लसूण पेस्ट, एक चमचा तिखट, दीड चमचा धनेपूड, एक चमचा जिरेपूड.
कृती:-मशरूम चिरा. थोडे तेल तापवून त्यात जिरे टाका, त्यानंतर कांदा परता. आलं, लसूण, धनेपूड टोमॅटो घालून शिजवा. त्यात उकडलेले मटार, आणि चिरलेले मशरूम घाला. रस्सा घट्ट ठेवा. जास्त पाणी घातलं तर चव लागणार नाही. या मशरूम करीला वेगवेगळ्या मसाल्याची चव देता येते. त्यासाठी तयार झालेल्या करीत कोणताही मसाला अर्धा चमचा घालावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मशरूम पुलाव
साहित्य:- दोन कप बासमती तांदूळ, पाऊण कप उकडलेले मटार, एक कप मशरूम, लसूण आणि आलं पेस्ट, तीन कांदे.
कृती:- तीन कांदे स्लाइस करून घ्या. या पुलावासाठी वेगळा मसाला तयार करावा लागेल. त्यासाठी मिरे, लवंगा, वेलची, शहाजिरे एकत्र वाटून घ्या. अगदी पावडर करण्याची गरज नाही. तुपावर कांदे स्लाइस केलेला कांदा परता. आलं-लसून पेस्ट, मशरूमचे तुकडे करून घ्या. पुलाव करण्यासाठी तांदूळ भिजवून जास्तीचे पाणी घालून शिजवून घेऊन त्यातील पाणी काढा. मग मसाल्यासह मशरूम टाकून प्रेशर कुकरमध्ये वाफवून घ्या किंवा मसाल्यासह धुतलेले तांदूळ कुकरमध्ये शिजवा. कोथंबीर, तळलेल्या कांद्याने सजवून वाढा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

क्रिमी मशरूम सूप
साहित्य:- चार चमचे तेल, एक चमचा आले-लसूण पेस्ट, चार हिरव्या मिरच्या, 200 ग्रॅम मशरूम, करी पावडर, मीठ, साखर, मिरेपूड, ४५० ग्रॅम नारळाचे दूध, तीन चमचे लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती:- एका पसरट भांड्यात चार चमचे तेल गरम करा. त्यात आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्यांचे लांब काप करून परता.
– मशरूमच्या पातळ काचऱ्या करून पाच मिनिटे गॅस मोठा ठेवून ढवळा. त्यात दोन चमचे करी पावडर, एक चमचा मीठ, एक चमचा साखर, काळे मिरेपूड आणि नारळाचे दूध घालून ढवळत राहा. आठ ते दहा मिनिटे गॅसवरच ठेवून सतत ढवळत राहा.
– आता पातेले गॅसवरून खाली उतरवून त्यात लिंबाचा रस घाला. मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा व सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मशरूम सँडविच
साहित्य:- २ हॉटडॉग ब्रेड्स, १ चमचा बटर, १/२ चमचा तेल, १५ ते १८ मशरूम उभे कापून, २ मध्यम कांदे, पातळ उभे कापून, १/२ वाटी किसलेले चीज, १/४ चमचा रेड चिली फ्लेक्स, १ चिमटी मिक्स हब्र्ज, मीठ आणि मिरपूड चवीनुसार
चिमटीभर साखर.
कृती:- कढईत तेल गरम करून त्यात बटर घालावे. बटर वितळले की कांदा घालून लालसर परतून घ्यावा. कांदा छान परतला की मशरूम घालावे. साधारण ४ ते ५ मिनिटे परतून शिजू द्यावे. मिक्स हब्र्ज, मीठ, मिरपूड आणि साखर घालून मिक्स करावे.
आच मंद करून चीज घालावे. चीज वितळेस्तोवर मिक्स करावे. रेड चिली फ्लेक्स घालून ढवळावे. ब्रेड एक बाजूने कट करावा, पण विरुद्ध बाजू कापली जाणार नाही याची काळजी घ्यावी. ब्रेड उघडून त्यात तयार मिश्रण भरून ग्रील करावे. ब्रेड थोडा क्रिस्पी झाला की सव्‍‌र्ह करावे. टॉमेटो केचप किंवा इतर आवडीच्या चटणीबरोबर सव्‍‌र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

पनीर मशरूम शासलिक
साहित्य : पनीर क्युब्स ८ ते १०, बटन मशरूम ७ ते ८, ब्लॅक ऑलीव्ह ५ ते ६, ग्रीन ऑलीव्ह ५ ते ६, रंगीत सिमला मिरची १ इंच कापलेले ५ ते ६ तुकडे, शासलिक स्टिक्स (बांबू स्टिक्स) ५ ते ६,
मॅरीनेशनसाठी साहित्य : मोहरी पूड – १ चमचा, मीठ, बाब्रेक्यु सॉस – २ ते ३ चमचे, (बाब्रेक्यू सॉस नसेल तर टोमॅटो केचप वापरा) व्हाइट पेपर पावडर- चिमूटभर, तेल – ३ ते ४ चमचे, बारीक चिरलेली लसूण – १ टीस्पून, बारीक चिरलेली बेसील पाने – २ चमचे (असल्यास), वरील सर्व साहित्य एका बाउलमध्ये एकत्र मिक्स करून मॅरीनेशन तयार करून घ्या.

कृती : तयार मॅरीनेशनमध्ये पनीर व मशरूम, ऑलीव्ह, रंगीत सिमला मिरची, डीप करून बांबू स्टिक्सला एकामागोमाग एक लावून घ्या. नॉनस्टिक पॅनवर थोडंसं तेल टाकून या स्टिक्स ग्रिल करून घ्या. गरमागरम बाब्रेक्यू सॉसबरोबर सव्‍‌र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*