साखरभात
साहित्य – ३ वाटया तांदूळ, ३ वाटया साखर, ४-५ लवंगा, २ दालचिनीचे तुकडे, २ वेलदोडे, २५ ग्रॅम बेदाणा, ७-८ वेलदोडयाची पूड, अर्धा चमचा मीठ, २ लिंबे, थोडेसे केशर, केशरी रंग व तूप.
कृती – तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीवर निथळत ठेवावेत. २ टेबलस्पून तूप, लवंगा, दालचिनी, वेलदोडै घालून फोडणी करावी. त्यावर धुतलेले तांदूळ घालून परतावेत. नंतर त्यात तांदुळाच्या दुप्पट पाणी व मीठ मोदक पात्रात पातेले ठेऊन नेहमीप्रमाणे भात शिजवून घ्यावा. (४०-४५ मिनीटे) भाताची वाफ जिरली की तो परातीत उपसून ठेवावा. भात गार झाला त्यावर लिंबाचा रस, केशरी रंग, केशराची पूड घालून अलगद हाताने कालवावे.
जरा मोठया पातेल्यात साखर व साखरेच्या निम्मे पाणी घालून पाक करावा. पाक गोळीबंद झाला पाहिजे. ताटात थोडा पाक टाकून पहावा. गोळी वळली गेली पाहिजे. गोळीचा खणकन आवाज आला पाहिजे. म्हणजे पाक झाला असे समजवावे. त्यात बेदाणे, वेलदोडयाची पूड व उपसलेला भात घालून ढवळावे. प्रथम भात जरा पातळ होईल नंतर घट्ट होईल. बाजूने साजूक तूप घालावे. हा भात गरम चांगला लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
केशरी भात
साहित्य: २५० ग्रॅम बासमती तांदूळ, एक टेबलस्पून बेदाणे, दोन टेबलस्पून लिंबाचा रस, एक टेबलस्पून चारोळ्या ३ ते ४ केशर काड्या १ चमचा दूधात चुरुन घ्याव्यात, दोन चिमटी खाण्याचा पिवळा रंग (पाव टीस्पून पाण्यात कालवून) ४ ते ५ लवंगा, २ ते ३ वेलच्या, दोन टेबलस्पून तूप.
कृती: एका पातेल्यात तूप घाला. आधी धुतलेले तांदूळ वेळून घ्या. तुपात लवंगा व २-३ वेलच्या घाला. त्या जराशा परतून घेतल्यावर त्यात भात घाला. तांदूळ चांगले परतून घ्या. या मिश्रणाच्या दुप्पट पाणी करत ठेवा. तांदूळ खमंग परतले गेले, की त्यामध्ये हवी असेल तेवढी साखर घालून हलवत राहा. मग पाणी ओता. मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा. शिजत आल्यावर लिंबाचा रस घालून ढवळा. यावर बेदाणे व चारोळ्या घाला. भात जवळ जवळ शिजला की त्यामध्ये केशर व रंग घाला. हलवा व झाकण ठेवा. एक वाफ येऊ द्या. अशाप्रकारे गरमागरम सणासुदीसाठी खास केशरी भात तय्यार. यावर तुम्ही हवे असल्यास अन्य सुका मेवा वापरुन सजावट करु शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संत्री घातलेला केशरी भात
साहित्य:- १ वाटी बासमती तांदूळ, २०० ग्रॅम साखर, १1 मोठे किंवा २ लहान संत्री, ३ मोठे चमचे लोणकढी तूप, ४ दालचिनीचे लहान तुकडे, ४ लवंगा, ४ वेलदोडे, पाव चमचा केशर (दुधात भिजवावे), १ मोठा चमचा संत्र्याच्या सालीचा किस, ८,१० बदाम व काजूचे काप, १०,१२ बेदाणे, खास प्रसंगी चांदीचा वर्ख व चेरीज, ३,४ थेंब ऑरेंज रंग.
कृती:- तांदूळ धुऊन तासभर बाजूला ठेवावे. ४ कप आधण पाण्यात तांदूळ वैरावे व १२,१३ मिनिटे प्रखर आचेवर अर्धवट शिजवावे. चाळणीवर निथळावे व त्यावर थोडे गार पाणी ओतावे. एका ताटात भात पसरून गार करत ठेवावा. साखरेत एक वाटी पाणी घालून एकतारीपेक्षा जरा कमी असा सुधारसाइतपत पाक करावा. एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की त्यावर लवंगा, दालचिनी व वेलदोडे फोडणीस टाकून त्यावर गार झालेला भात, संत्र्याच्या सालीचा किस व पाक घालावा. संत्र्याचा रस काढावा व ताजा रस भातात घालावा. रंगाचे थेंब व काजू, बदाम, बेदाणे (निम्मे) घालावे, झाकण ठेवावे. पाच मिनिटांनंतर वाफ आली की पातेल्याखाली एक तवा ठेवावा. केशर शिंपडावे व मंद आचेवर भात पुरता शिजवावा. उरलेले काजू, बेदाणे, वर्ख, चेरीज इत्यादी सजावट करून शोभिवंत भांड्यात भात ठेवावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply