साहित्य:- १/२ कप तुरडाळ, १/४ कप चिंच (१ कप चिंचेचा कोळ), ४ ते ६ छोटे कांदे, दुधी भोपळ्याच्या मध्यम फोडी, ५ ते ६ (साल काढून टाकावे), वांग्याच्या मध्यम फोडी, ५ ते ६, २ शेवग्याच्या शेंगा (३ इंच तुकडे), २ मध्यम टोमॅटो, मोठ्या फोडी, १ टीस्पून गूळ, सांबार मसाला, फोडणीसाठी २ टिस्पून तेल, १ टिस्पून उडीद डाळ, १/४ टिस्पून मोहोरी, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १० पाने कढीपत्ता, १ हिरवी मिरची.
कृती:- सगळ्यात आधी सांबार मसाला बनवून घ्यावा. तुरीची डाळ मऊसर शिजवून व घोटून घ्यावी. फोडणीसाठी तेल गरम करावे. त्यात मोहोरी, उडीद डाळ, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरची घालून फोडणी करावी. फोडणीत कांदा आणि शेवग्याच्या शेंगा घालून १ मिनीट परतावे. त्यात १ कप पाणी घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी. अर्धवट शिजल्यावर त्यात वांगे, दुधी भोपळा घालावा. चिंचेचा कोळ आणि १ टिस्पून मिठ घालावे आणि मध्यम आचेवर साधारण १५ मिनीटे वाफ काढावी. वाटल्यास १ कप पाणी घालावे. सर्व भाज्या शिजल्यावर घोटलेली डाळ घालावी. चव पाहून मिठ घालावे. गरजेनुसार पाणी घालावे. तयार केलेल्या मसाल्यापैकी २ टिस्पून मसाला, गूळ आणि टोमॅटोच्या फोडी घालून मध्यम आचेवर पातेल्यावर झाकण ठेवून वाफ काढावी व २ ते ३ मिनीटे उकळी येऊ द्यावी. थोडा रंग येण्यासाठी १/२ चमचा लाल तिखट घालावे.
तयार सांबाराची चव पाहावी आणि गरजेनुसार मसाला मिठ घालून उकळी काढावी. गरमा गरम सांबार इडली, डोसा, उत्तप्पा, मेदू वडा यासारख्या दाक्षिणात्य पदार्थांबरोबर छान लागतो.
टीप: सांबार मसाल्यातील साहित्य काळपट होईस्तोवर भाजू नये सांबाराचा रंगा बदलतो. दुधी भोपळ्याच्या साली काढून टाकाव्यात नाहीतर साल कचवट राहते.
आवडीप्रमाणे बटाटा, लाल भोपळा यांसारख्या भाज्याही सांबारात वापरू शकतो. जर छोटे कांदे नसतील तर साधे वापरातले कांदे मोठ्या फोडी करून वापरू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply