मानवी समस्यांना काही मर्यादाच नाही. मानवाच्या जन्मापासून ज्या समस्या सुरू होतात त्या त्याच्या मृत्यानंतरही त्याचा पाठलाग करीत राहतात. धन – संपत्ती आणि सत्ता हेच मानवी समस्यांवरील एक रामबाण औषध असल्याचे मानव स्वतःला अगदी अनादी काळापासून पटवून देत आलाय आणि देत आहे त्यामुळेच धन – संपत्ती आणि सत्ता मिळविण्याचा मोह त्याला सहजी टाळ्ता येत नाही. ज्यांना तो टाळ्ता येतो त्यांचा ‘बुध्द’ होतो. मोहच आज ही मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे. हा मोहामुळेच संपूर्ण मानवजाती विनाशाकडे वाटचाल करीत आहे. आपल्या गरजेपेक्षा जास्त मिळविण्यासाठी प्रत्येक माणूस धडपडत आहे. त्या धडपडीत आज माणूसच मानव जातीचा सर्वात मोठा शत्रू झालेला आहे. जगभरात नाते-संबंध नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, संस्कार क्षीण होत चाललेत, संस्कृती लयाला जाण्याच्या मार्गावर आहे. सर्वत्र त्यागाची जागा स्वार्थाने घेतलेली आहे. आजचा मानव मानसिक शांतीच्या शोधात वणवण करीत असला तरी ती त्याला जगात कोठेही सापडलेली नाही आणि आता सापडणार ही नाही. मोह, स्वार्थ, धन- संपत्ती आणि सत्ता यांपासून दूर राहणार्यांरना आजच्या जगात मुर्खात काढले जाते पण खरं तर ते किंचित का होईना मानसिक शांतीच्या जवळ-पास असतात. आज माणूस धन- संपत्ती आणि सत्तेसाठी इतका हापापलेला आहे की त्याला जवळ- जवळ सर्वच नात्यांचा विसर पडलेला आहे. आपण हे जग सोडून जाताना स्वतःसोबत काहीही घेऊन जाऊ शकत नाही हयाचा ही आजच्या मानवाला विसर पडलेला आहे. आपल्या पुढच्या पिढयांच भविष्य सुरक्षीत करण्यासाठी काही हजार लोक वर्तमानात लाखो लोकांच जगण असहय करण्याला कारणीभूत ठरत आहेत.
— निलेश बामणे
Leave a Reply