यष्ट्या एका क्षणी उडवून फलंदाजाला परतीची वाट दाखविणार्या माणसाला यष्टी‘रक्षक’ का म्हणत असावेत ? कसोटी इतिहासातील यष्टीमागील बळींचे शतक पूर्ण करणार्या पहिल्या व्यक्तीचा जन्म ९ सप्टेंबर १८९४ रोजी झाला. त्याने बूट खुंटीला टांगून ठेवले तेव्हा त्याच्या ग्लोव्ह्जवर १३० बाद-खुणा उमटलेल्या होत्या आणि त्यापैकी केवळ अठ्ठ्याहत्तर खुणा झेलांच्या होत्या. तब्बल ५२ फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या बर्ट ओल्डफील्डने यष्टीचित केले होते. आजही हा विश्वविक्रम आहे! शरीरवेधी गोलंदाजीमुळे गाजलेल्या १९३२-३३ च्या अॅशेस मालिकेत हॅरॉल्ड लारवूडच्या एका उसळ्या चेंडूने जखमी होण्याआधी बर्टीने ४१ धावा काढल्या होत्या. एकूण चार अर्धशतके त्याच्या नावावर आहेत.
इतकी सगळी एकदिवसीय शतके रचणार्या फलंदाजाला पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतकासाठी किती सामने वाट पाहावी लागली असेल म्हणता ? उत्तर आहे सातावर सात ! आपल्या कारकिर्दीतील अठ्ठ्याहत्तराच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या सचिन तेंडुलकरने कोलंबोतील रणिलसिंघे प्रेमदासा मैदानावर (त्यावेळी हे मैदान ‘खेत्तरमा मैदान’ म्हणून ओळखले जाई) ९ सप्टेंबर १९९४ रोजी ४३ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले आणि ह्या पन्नाशीला आणखी एका पन्नाशीची जोड देण्यात तो यशस्वी झाला. सामना होता सिंगर विश्व मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध. हा सामना भारताने ३१ धावांनी जिंकला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply