नवीन लेखन...

रिसेशन येती घरा !

आमच्या बॅंकेच्या लोन डिफॉल्टरच्या लिस्टवर दर तीन महिन्यानी सही करायचे काम फिल्ड ऑफिसर म्हणुन माझ्याकडेच आहे , सहसा मी या यादीवर नुसती नजर टाकतो , आणि सही करुन टाकतो . यात विशेष असे काहीच बघण्यासारखे नसते. ही लिस्ट आमच्या रिकव्हरी एजन्सीकडे जाते , आणि ती एजन्सी येन केन प्रकारेण लोनची रिकव्हरी करुन बॅंकेत भरते. याबद्दल काही पर्सेंटेज रिकव्हरी एजन्सीला मिळते . आज मात्र या यादीत गजानन बंडोपंत कुलकर्णी हे नाव बघुन माझा हात थबकला. या महाशयांनी तीन महिन्यांचा कार लोनचा हप्ता चुकवला होता .हे महाशय म्हणजे माझा परममित्र गजा . वर्षभरापुर्वीच हे कारलोन घेण्यासाठी मी गजाला मदत केली होती . तसे गजा आणि त्याची बायको स्नेहा चांगल्या नोकरीत आहेत . गजा इंजिनियरींग कॉलेजला प्रोफेसर आहे , तर बायको सॉफ्टवेअर ऍनालिस्ट . दोघांनाही अत्यंत चांगला पगार आहे. त्यावरच गजाने तीन वर्षापुर्वी साठ लाखांचे घर घेतले होते , आणि मागच्या वर्षी कारलोन घेऊन होंडा सिटी घेतली . तिचाच हप्ता आता थकला होता .कारण काही कळाले नव्हते . गजाची पण बर्‍याच दिवसात भेट नव्हती . संध्याकाळी मी गजाच्या घरी जायचे ठरवले , आणि त्या लिस्टवर सही केली . अर्थात त्या आधी गजाच्या नावापुढे फुली मारायला मी विसरलो नव्हतो . काही प्रतिष्ठित ग्राहकांना आमची बॅंक थोडा वेळ देते , आणि त्यांच्या अडचणीपण समजावुन घेते . फिल्ड ऑफिसर म्हणुन एवढा अधिकार माझ्याकडे आहे.

’ क्लाउड नाइन ‘ या गेटेड कम्युनिटीमधे गजाचे घर आहे. स्विमिंग पुलापासुन जॅकुजीपर्यंत सर्व सुविधा या अपार्टमेंटमधे आहेत. गाडी लावली आणि गजाच्या घराची बेल वाजवली . बागेकडे माझे लक्ष गेले , गजाने बागेत अत्यंत सुंदर झाडे लावली होती. मोगर्‍याचा फुलांचा घमघमाट सुटला होता. गजाने दार उघडले .

” अरे तू , ये बस बस . “ गजा लुंगी आणि बनियनवरच होता . कितीही मोठा झाला तरी माणसाच्या काही सवयी बदलत नाहीत .

” बर्‍याच दिवसात घरी आला नाहीस ? इकडे आलो होतो , म्हटलं जरा चक्कर टाकावी . कसा आहेस ? “

” मजेत . मधे तु काय आठ दिवस दिल्लीला होतास म्हणे . स्नेहा सांगत होती . तिची आणि वहिनींची मार्केटमधे भेट झाली होती. “

” हो , गौरी म्हणाली मला . ‘ कस्टमर सॅटिसफॅक्शनच ‘ ट्रेनिंग होतं दिल्लीला . नेमकं मला पाठवलं बॅंकेनी . तुला सांगतो गजा , या ट्रेनिंग म्हणजे नुसता वैताग बघ ! या एमबीए मुलांपेक्षा आपल्या शाळेतले शिक्षक बरे. ते रागवायचे , पण किमान त्यावेळेला त्यांच्या चेहेर्‍यावर रागवण्याचा अविर्भाव तरी असायचा . ही एमबीए मंडळी अत्यंत सुतकी चेहेर्‍याने प्रेझेंटेशन करतात . आपलच सॅटिसफॅक्शन होत नाही , कस्टमरचं काय होणार बोडख्याच ! ”

यावर मी आणि गजा खदाखदा हसलो.

” बरं काय घेणार चहा , की कॉफी ? “

” चहा चालेल .”

“ स्नेहा , दोन कप चहा टाक गं , सागर आलाय “.

मधुन जोरात भांडी आपटण्याचा आवाज आला , आणि नंतर चहासुध्दा गजाच जाउन घेउन आला , मी ओळखले , नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे . चहा पिला थोड्याफार गप्पा मारल्या , आणि मी निघालो. गेटचे दार लावताना गजाला विचारले ,

” गजा , इज एव्हरीथिंग ओके ? “

” सागर , एक्चुअली थोडा प्रॉब्लेम झालाय. ” गजाचा आवाज खोल गेला .

“ कॅन आय हेल्प यु ? “

” आपण उद्या दुपारी भेटु . मी बॅंकेत येतो “ . गजा म्हणाला .

” ओके . टेक केअर . “ मी गजाच्या खांद्यावर थोपटत म्हणालो.

दुसर्‍या दिवशी कामात लक्षच लागेना . दुपारची वाट बघत बसुन राहिलो . एक वाजता गजा आला .

” सागर आपण बाहेरच लंचलाच जाउ या . आर यु फ्री ? “

” या शुअर . जरा पाच मिनिट थांबतोस ? मी चाव्या साहेबांकडे देउन येतो. “

“ प्लीज कंटीन्यू .”

साहेबांना चाव्या दिल्या आणि बॅंकेसमोरच्याच एका चांगल्यापैकी हॉटेलात गेलो . ऑर्डर दिली .

” आता बोल गजा . काय प्रॉब्लेम ? “

” अरे एक्चुअली – काय झालय ? स्नेहाला त्यांच्या कंपनीने पिंक स्लिप दिलीये . “

“ मग ? “

” मग काय ? त्याचा अर्थ आपण रिझाइन करायच किंवा एक महिन्याने कंपनी आपल्याला काढुन टाकणार .”

” का ? “

” का काय बाबा, त्यांच्या कंपनीचे सर्व क्लायंटस युएसचे . त्यांच्याकडे आलय रिसेशन. त्याचा फटका बसतोय आम्हाला . “

” अरे पण एवढ काय त्यात ? “

” तुला कळणार नाही सागर , तु अजुन होमलोन घेतल नाहियेस ना , मी तीन वर्षांपुर्वी साठ लाखाच लोन काढुन घर घेतलय . त्याचा हप्ता मला पन्नास हजार येतोय . तो मी माझ्या पगारातुन भरतो. तोपण थोडाथोडका नाही वीस वर्ष भरायचाय . तो भरल्यानंतर दहा हजार रुपये उरतात . मागच्या वर्षी स्नेहाच्या सॅलरीवर कारलोन घेउन होंडासिटी घेतली. तिचा हप्ता वीस हजार रुपये जातो . तिच्या पगारातले पंधरा हजार उरतात , अशा पंचवीस हजारात आमचा महिना भागतो .”

” ओके .”

” तुला खरे वाटणार नाही , इतक्या वर्षांची सर्विस झाल्यावरपण पाच पैशाचीही सेव्हिंग माझ्याकडे नाही . सगळ काही क्रेडिटवर आहे . तुला माहित आहे , मागच्या तीन महिन्यापासुन कारलोनचा हप्ताही भरला नाहीये मी .”

मला ही गोष्ट माहित असल्याचे मी बोललो नाही . गजा अत्यंत भावनाविवश झाला होता .

” आणि आता या नविन लाइफस्टाइलची इतकी सवय झालीये , दर रविवारी कंपल्सरी मल्टीप्लेक्सला जातो , रविवारी घरी जेवण बनवत नाही , बाहेर साधं हॉटेल चालत नाही , थ्री स्टार लागतं , दरवर्षी हॉलिडेला जावच लागत , इव्हन सोनुलापण या सर्वांची सवय झालीये. माहितीये , काल शाळेत रिक्शातुन जा म्हणालो तर गेला नाही . गाडी नसेल तर शाळेत जाणार नाही म्हणाला . अजुन चार वर्षाचा झाला नाही आणि याचे नखरे बघा .”

” त्याच्यावर काय चिडतोयंस गजा ? ही सवय तुम्हीच लावली ना त्याला ? “

” होय रे बाबा , तेच चुकलेय . बर त्याचेच नाही , स्नेहाचेपण तसेच . महागड्या साड्या , मॉलमधे शॉपिंग , महागडी परफ्युम्स , आमच्या घरात ब्रॅंडेड वस्तुंना फार महत्व आलयं . सकाळच दुधपण साधं चालत नाही , ब्रॅंडेड लागतं .”

“गजा चिडु नकोस . हे बघ ,या सगळ्या सवयी तूच लावल्यांस ना त्याला . मग बदल . त्यात अवघड ते काय आहे ? “

” सागर ही वेळ तुझ्यावर आली नाहियेना , म्हणुन तु सल्ला देतोयस ,एकवेळ संपुर्ण माणुसच बदलणे शक्य आहे , पण त्याच्या सवयी , अशक्य ! “

” हे बघ, स्नेहाशी एकदा समोर बसुन बोल , तिला परिस्थितीची कल्पना दे . ती समजुतदार आहे , मला वाटतय ती समजावुन घेईल. “

“सगळे प्रकार झाले सागर , म्हणुनच मी म्हणालो ना , माणसाच्या सवयी बदलणे ,अशक्य ! ती बदलायला तयार नाही . मीच चुकलो , पुर्वी लहान घरात मी सुखी होतो , थोडाचा पैसा आला आणि मी वाहावत गेलो . या वर्षी ईन्क्रीमेंट मिळाले ,या एवढ्या गोष्टीवरच खुश राहिलो. पुढच्या आयुष्याचा काडीचाही विचार केला नाही , आणि स्वतःवर ही वेळ आणुन घेतली .”

“मला वाटतय , तु तिच्याशी एकदा मोकळेपणाने बोलावस . आणि सर्व परिस्थीती समजावुन सांगावीस . मी गजाच्या हातावर हात ठेवत म्हणालो .”

“ट्राय करतो .”

जेवण करुन गजा गेला . बिल देउन मी बॅंकेत आलो. फारफारतर दोन महिने मी गजाच्या कारलोनची रिकव्हरी थांबवू शकलो असतो. त्यानंतर मात्र काहीही माझ्या हातात नव्हते .

संध्याकाळी घरी आलो. फ्रेश झालो . पेपर हातात घेउन बसलो.गौरी म्हणाली

“उद्या आमीरचा थ्री इडियटस आयनॉक्सला लागतोय . मी तिकीट बुक करायला सांगितलीयेत . नंतर बाहेरच जेवण करुन घरी येउ.”

मी चरकलो .डोळ्यासमोर गजा उभा राहीला.

“माझा मुड नाहिये ग . आपण उद्या नको, पुढच्या आठवड्यात जाउ . एखाद्या आठवड्यात बाहेर पिक्चरला आणि जेवायला नाही गेलो तर काही बिघडत नाही .”

“ते काही नाही . मला शक्य नाही . मी उद्या स्वयंपाक करणार नाही . आणि रविवारी बाहेर जेवायला नेले नाही तर पिंटु रडुन गोंधळ घालतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचे ते करा , मी जाणार म्हणजे जाणारच ..”

ताडताड पाय आपटत गौरी मधे निघुन गेली. मला गजाचे शब्द आठवले

‘ एकवेळ माणसेच बदलणे शक्य आहे पण त्यांना लागलेल्या सवयी ,अशक्य ! ‘

या बदलत्या जगाने माझेच घर कधी विळख्यात घेतले होते , माझे मलाच कळाले नव्हते !

— निखिल मुदगलकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..