मराठीसृष्टीच्या सर्व वाचकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिपावलीनिमित्त मराठीसृष्टीने नवीन रुप धारण केलेले आपण बघितलेच आहे. मराठी भाषेसाठीच्या तंत्रज्ञानात नित्यनवे बदल करणे आणि नवेनवे प्रयोग करणे हे मराठीसृष्टीचे एक खास वैशिष्ट्य आहेच. त्यामुळे या पोर्टलवर आपल्याला नेहमीच काहीतरी नवीन अनुभवायला मिळते.
मराठीमध्ये खरंतर मोठी पोर्टल्स अतिशय मोजकीच आहेत. वृत्तपत्रांच्या म्हणून ज्या वेबसाईटस आहेत त्यांना भले वाचकवर्ग बराच मोठा मिळत असेल, पण त्यांची खरी ओळख केवळ त्या त्या वृत्तपत्राची इंटरनेटवरची आवृत्ती – जी सामान्यपणे त्या वृत्तपत्रातील बातम्या कॉपी करुन बनवलेली असते – अशीच आहे. त्यामुळे अशा वृत्तपत्रांच्या वेबसाईटसना काही वेगळा चेहेरा नसतो.
मराठीसृष्टीने मात्र आपलं वेगळेपण सुरुवातीपासून जपलंय. वाचकांना एक वेगळा अनुभव देणं हे यामागचं सूत्र आहेच, पण आता आम्ही आमच्या वाचकांना आणखीही काहीतरी देतोय. मराठी भाषेत जास्तीत जासगत मजकूर इंटरनेटवर उपलब्ध करण्याच्या मराठीसृष्टीच्या या प्रयत्नात आता आमच्या वाचकांना आम्ही मोठ्या संख्येने सामावून घेतोय. आमच्या वाचकांसाठी मराठीसृष्टीवर लिहिण्याची सोय तर पूर्वीपासूनच उपलब्ध आहे. मात्र या सोयीचा फायदा घेणार्या वाचकांमध्ये मोठ्या प्रमाणात भर घालण्यासाठी एक योजना आम्ही बनविली आहे आणि पुढच्या एक-दोन दिवसात ती अमलातही येत आहे. या योजनेची माहिती सोमवारी, म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी आमच्या सर्व वाचक आणि लेखकांना इ-मेलद्वारे पाठवली जाईल आणि ती येथेही प्रदर्शित केली जाईल.
मराठी भाषेत अक्षरश: लक्षावधी पानांचा मजकूर तयार करुन तो इंटरनेटवर आणून मराठी भाषेला इंटरनेटवर समृद्ध करणे या उद्देशाने झपाटलेल्या मराठीसृष्टीच्या टीमकडून आपणा सर्वांना दिपावलीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा !!!!!
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply