नवीन लेखन...

ऑक्टोबर ११ – जन्म-मृत्यू ११ ऑक्टोबर आणि ‘मंद’ कसोटी

११ ऑक्टोबर १९४३ रोजी खर्‍याखुर्‍या कॅलिप्सो खेळाडूचा जन्म झाला. (कॅलिप्सो हा आधी एकदा सांगितल्याप्रमाणे वेस्ट इंडीजमधील – विशेषतः त्रिनिदादमधील – तालबद्ध नृत्याचा एक प्रकार आहे.) किथ डेविड बॉईस हा मान्यताप्राप्त मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये (यादी अ – यात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामनेही येतात) सर्वप्रथम एकाच डावात ८ गडी बाद करणारा राकट वेगवान गोलंदाज आणि विंडिजचा तळातील एक जोरकस फलंदाज होता.

१९७१ मध्ये एसेक्ससाठी लँकेशायरविरुद्ध त्याने २६ धावांत ८ गडी बाद करीत विश्वविक्रमी कामगिरी केली. दुसर्‍या कुणा गोलंदाजाने अशी कामगिरी करण्यासाठी तब्बल १८ वर्षे जावी लागली.

थोडेसे विषयांतर पण यादी अ मधील गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे एका भारतीयाची – राहुल संघवी. दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश सामन्यात त्याने अवघ्या १५ धावा मोजत ८ गडी बाद केले होते. त्यानंतर क्रमांक येतो चमिंडा वाजचा. झिंबाब्वेविरुद्ध १९ धावांमध्ये ८ बळी. हा आंतरराष्ट्रीय सामना होता.

किथचा उत्साह दांडगा होता. एसेक्ससाठी तो १९६६ ते १९७७ अशी सलग अकरा वर्षे खेळला. चेम्सफर्डला १९७५ साली लिसेस्टर्शायरविरुद्ध त्याने अवघ्या ५९ मिनिटांमध्ये शतक झळकावले होते. २१ कसोट्या खेळला असला तरी एकदिवसीय सामने त्याच्यासाठीच असावेत असे वाटे. इंग्लंडमधील मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये हजार धावा जमवून वर १०० बळीही घेणारा तो पहिलाच खेळाडू होता.

१९७५च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने झटपट ३४ धावा काढल्या होत्या आणि ५० धावांत ४ गडीही बाद केले होते. आपल्या मायभूमीतच ११ ऑक्टोबर या तारखेलाच त्याला मृत्यूने गाठले १९९६ मध्ये. यकृत सूत्रण (लिवर सिरॉसिस – अतिरेकी मद्यपान हे मुख्य कारण) हे त्याच्या मृत्यूचे कारण ठरले आणि मृत्यूसमयी तो एका औषधाच्या दुकानात खुर्चीवर बसलेला होता.

११ ऑक्टोबर १९५६ हा कसोटी इतिहासातील सर्वाधिक ‘मंद’ दिवस मानला जातो. निद्रानाशाचा तीव्र विकार असणार्‍या मनुष्यालाही कराचीत या दिवशी झोप आली असती. सामना होता पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया. दिवसभरात दोन्ही संघांचे मिळून १२ गडी बाद झाले आणि धावा निघाल्या अवघ्या पंच्याण्णव. कांगारू-पाकिस्तानदरम्यानचा हा पहिलाच कसोटी सामना होता.

फझल मेहमूद ६ बळी आणि खान मोहंमद ४ बळी या दोघांनीच कांगारूंचा पहिला डाव ८० वर संपविला होता! दिवसाखेर पाकने २ बाद १५ धावा काढल्या होत्या.

ही कसोटीही इतिहासातील ‘मंद’ कसोट्यांपैकी एक गणावी लागेल. हा सामना आठवडाभर चालला. १४ ऑक्टोबर आणि १६ ऑक्टोबर हे दोन्ही विश्रांतीचे दिवस होते. चौथ्या डावात, सातच्या दिवशी ६९ धावा काढून यजमानांनी हा सामना जिंकला.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..