११ ऑक्टोबर १९४३ रोजी खर्याखुर्या कॅलिप्सो खेळाडूचा जन्म झाला. (कॅलिप्सो हा आधी एकदा सांगितल्याप्रमाणे वेस्ट इंडीजमधील – विशेषतः त्रिनिदादमधील – तालबद्ध नृत्याचा एक प्रकार आहे.) किथ डेविड बॉईस हा मान्यताप्राप्त मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये (यादी अ – यात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामनेही येतात) सर्वप्रथम एकाच डावात ८ गडी बाद करणारा राकट वेगवान गोलंदाज आणि विंडिजचा तळातील एक जोरकस फलंदाज होता.
१९७१ मध्ये एसेक्ससाठी लँकेशायरविरुद्ध त्याने २६ धावांत ८ गडी बाद करीत विश्वविक्रमी कामगिरी केली. दुसर्या कुणा गोलंदाजाने अशी कामगिरी करण्यासाठी तब्बल १८ वर्षे जावी लागली.
थोडेसे विषयांतर पण यादी अ मधील गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे एका भारतीयाची – राहुल संघवी. दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश सामन्यात त्याने अवघ्या १५ धावा मोजत ८ गडी बाद केले होते. त्यानंतर क्रमांक येतो चमिंडा वाजचा. झिंबाब्वेविरुद्ध १९ धावांमध्ये ८ बळी. हा आंतरराष्ट्रीय सामना होता.
किथचा उत्साह दांडगा होता. एसेक्ससाठी तो १९६६ ते १९७७ अशी सलग अकरा वर्षे खेळला. चेम्सफर्डला १९७५ साली लिसेस्टर्शायरविरुद्ध त्याने अवघ्या ५९ मिनिटांमध्ये शतक झळकावले होते. २१ कसोट्या खेळला असला तरी एकदिवसीय सामने त्याच्यासाठीच असावेत असे वाटे. इंग्लंडमधील मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये हजार धावा जमवून वर १०० बळीही घेणारा तो पहिलाच खेळाडू होता.
१९७५च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने झटपट ३४ धावा काढल्या होत्या आणि ५० धावांत ४ गडीही बाद केले होते. आपल्या मायभूमीतच ११ ऑक्टोबर या तारखेलाच त्याला मृत्यूने गाठले १९९६ मध्ये. यकृत सूत्रण (लिवर सिरॉसिस – अतिरेकी मद्यपान हे मुख्य कारण) हे त्याच्या मृत्यूचे कारण ठरले आणि मृत्यूसमयी तो एका औषधाच्या दुकानात खुर्चीवर बसलेला होता.
११ ऑक्टोबर १९५६ हा कसोटी इतिहासातील सर्वाधिक ‘मंद’ दिवस मानला जातो. निद्रानाशाचा तीव्र विकार असणार्या मनुष्यालाही कराचीत या दिवशी झोप आली असती. सामना होता पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया. दिवसभरात दोन्ही संघांचे मिळून १२ गडी बाद झाले आणि धावा निघाल्या अवघ्या पंच्याण्णव. कांगारू-पाकिस्तानदरम्यानचा हा पहिलाच कसोटी सामना होता.
फझल मेहमूद ६ बळी आणि खान मोहंमद ४ बळी या दोघांनीच कांगारूंचा पहिला डाव ८० वर संपविला होता! दिवसाखेर पाकने २ बाद १५ धावा काढल्या होत्या.
ही कसोटीही इतिहासातील ‘मंद’ कसोट्यांपैकी एक गणावी लागेल. हा सामना आठवडाभर चालला. १४ ऑक्टोबर आणि १६ ऑक्टोबर हे दोन्ही विश्रांतीचे दिवस होते. चौथ्या डावात, सातच्या दिवशी ६९ धावा काढून यजमानांनी हा सामना जिंकला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply