१९६८ : दणदणीत पदार्पण, खणखणीत पुनरागमन आणि चटपटीत अपयश अशा विचित्र रंगांची कारकीर्द लाभलेल्या नरेंद्र दीपचंद हिरवानीचा जन्म. स्थळ गोरखपूर, उत्तर प्रदेश. त्याच्याइतके झक्कास पदार्पण लाभायला भाग्यच हवे. १९८७-८८ च्या मोसमात मद्रासमध्ये विंडीजविरुद्ध १३६ धावा देऊन १६ गडी बाद करीत हिरवानीने मोठ्ठा आवाज केला. दुसर्या डावातील त्याच्या ८ बळींमध्ये किरण मोरेच्या पाच यष्टीचितांचा समावेश होता. विज्डेनच्या संवाददात्याच्या म्हणण्यानुसार “याच्यावर जोर द्यायलाच हवा की त्याला अत्यंत निकृष्ट दर्जाच्या खेळपट्टीची साथ लाभली.” यशस्वी कारकीर्द आणि यशस्वी पदार्पण यांचा संबंध काही वेगळाच असावा. पहिल्या चार कसोट्यांमधून ३६ गडी बाद करणारा हिरवानी पुढे ९ सामन्यांमधून केवळ २१ गडीच बाद करू शकला. २३ वर्षांहून अधिक काळ तो प्रथमश्रेणी सामने खेळला.
१९९२ : झिंबाब्वेने हरारेत भारताविरुद्ध खेळून कसोटीपदार्पण केले. आश्चर्य म्हणजे पहिल्याच सामन्यात झिम्मींनी पराभव स्वीकारला नाही. पहिल्या डावात २१५ षटके खेळत त्यांनी ४२६ धावा केल्या- कधी कसोटी खेळायला न मिळाल्यासारखे ते खेळत होते !! बरोब्बर १०० धावांची सलामी केविन अर्नॉट आणि ग्रँट फ्लॉवराने दिली. डेव हॉटन या झिम्मी कर्णधाराने पदार्पणातच शतक ठोकले. मात्र त्याच्याआधी ग्रँट फ्लॉवरने अर्धशतक पुरे केले होते. हॉटननंतर अँडी फ्लॉवरनेही अर्धशतक पूर्ण केले. हेही खरेतर समजण्यासारखे होते पण भारतीयांची बारी आली तेव्हा भारतीयांनी १७० षटकांमध्ये केवळ ३०७ धावाच काढल्या. संजय मांजरेकर आठ तासांहून अधिक काळ खेळत शतक पूर्ण केले. २२ वर्षे आणि २२२ दिवसांनंतर जॉन ट्राईकोस ‘पुन्हा’ कसोटी खेळला. पूर्वी तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळला होता. पंचेचाळीस वर्षांच्या ट्राईकोसने १९ वर्षांच्या सचिन तेंडुलकरला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेत तिसर्याच चेंडूवर बाद केले. त्या तिन्ही चेंडूंवर सचिनला धाव काढता आली नव्हती. झिम्मींनी पदार्पणातच मास्टर ब्लास्टरला शून्यावर परतविले. भारताला दुसरा डाव आलाच नाही!
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply