गोइंग, गोइंग, गॉन १९४० : जेफ्री बॉयकॉटचा जन्म. त्याची प्रतिभा आणि तंत्र याबाबत कुठेही दुमत नाही पण त्याच्या अप्पलपोटेपणामुळे क्रिकेटविश्वात त्याच्याबद्दल विविध मते आढळतात. हेडिंग्लेवर एकदा मंदवेगाने (१९६७ साली भारताविरुद्ध) त्याने २४६ धावा काढल्या होत्या; पण ‘शिक्षा’ म्हणून पुढच्या सामन्यातून त्याला वगळण्यात आले. त्याचे तंत्र अत्युत्तम होते पण चांगले चांगले फटके जाळ्यात सराव करतानाच मारावयाचे असतात असे त्याला वाटे की काय कोण जाणे (बॉयकॉटच, आणखी कोण?). स्वतःच स्वतःच्या नैसर्गिक खेळाला मुरड घालणार्यांमध्ये तो ‘न्यूमरो युनो’ (नंबर एक) होता. हेडींग्लेवर १९७७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत त्याने शतक करून प्रथमश्रेणीतील शतकांचे शतक पूर्ण केले. आज तो प्रख्यात दूरदृश्य समालोचक आहे. २००२ मध्ये त्याच्या घशाला कर्करोगाची लागण झाल्याचे निदान झालेले आहे पण बॉयकॉटने आपली उपजीविका बदलली नाही. आता तो चांगला ठणठणीत बरा झालेला आहे.
उमदा उल्येट १८५१ : यॉर्कशायरच्या जॉर्ज उल्येट या उमद्या अष्टपैलू खेळाडूचा जन्म. त्याची २४ ही त्या काळातील सरासरी तो काळ पाहता आजमितीच्या ४८ पेक्षा चांगली आहे. तो भेदक चेंडूबाजही होता. १८८२ मध्ये मेलबर्नमध्ये त्याने काढलेल्या १४९ धावा हे इंग्लिश माणसाचे ऑस्ट्रेलियातील पहिले शतक होते. १८८४ मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात ३९.१ चौथकांमध्ये (त्या काळी षटकात चार चेंडू असत) ३८ धावा देत ७ बळी त्याने बाद केले. पराभव आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील वेळेचा अडसर त्याने फार लवकर दूर सारला. १८९० मध्ये लॉर्ड्सवर तो अखेरची कसोटी खेळला. ४ बाद २० वर मैदानात उतरून त्याने ७४ धावा काढल्या. शेफील्डमध्ये १८९८ साली न्यूमोनियाने त्याने निधन झाले.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply