बकरा केन – १९६५ : न्यूझीलंडच्या केन रुदरफोर्डचा जन्म. केनच्या कसोटी कारकिर्दीची सुरवात वाईट झाली. कॅरिबिअन बेटांवरील १९८४-८५ च्या पहिल्याच मालिकेत त्याने सात डावांमध्ये मिळून बाराच धावा काढल्या. पदार्पणाच्या कसोटीत दुसर्या डावात एकाही चेंडूचा सामना न करता धावबाद होत त्याने ‘चष्मा’ पटकावला. दोन्ही डावांमध्ये शून्यावर बाद होणार्या फलंदाजाची सामन्यातील कामगिरी ०० अशी येते. हे चष्म्यासारखे दिसते म्हणून त्याला ‘पेअर’ म्हणण्याचा प्रघात आहे. एकाही चेंडूचा सामना न करता बाद होण्याचा पराक्रम ‘डायमंड डक’ = हिरेबदक म्हणून ओळखला जातो. पहिल्याच चेंडूवर बाद होणे म्हणजे सुवर्ण‘ब’दक, दुसर्यावर बाद झाल्यास रजत’ब’दक आणि तिसर्यावर झाल्यास कांस्य’ब’दक. माल्कम मार्शलने पाच वेळा बाद करीत रुदरफोर्डला आपले गिर्हाईक बनविले. नंतर मात्र तो या भयावह सुरुवातीतून सावरला. कसोटीत त्याची सरासरी २७ एवढी राहिली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षीच दुर्दैवाने त्याची कसोटी कारकीर्द संपली.
कैदी हॅरी – १८९० : पहिल्या महायुद्धादरम्यान कैदी म्हणून पकडल्या गेलेल्या एकमेव कसोटीवीराचा जन्म. हॅरी ली याला जर्मनांनी पकडल्यानंतर तो मृत्यू पावल्याचे (चुकीचे) वृत्त प्रसिद्ध झाले. मांडीला जबरदस्त दुखापत झाल्याने तो पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही असे सांगितले गेले. हा आडाखाही चुकीचा ठरला. काहीसा लंगडत असूनही लीने मिडलसेक्ससाठी वीस हजारावर धावा काढल्या आणि चारशेहून अधिक बळीही घेतले. १९३०-३१ मध्ये पर्सी चॅपमनच्या संघाला दुखापतींनी घेरल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका कसोटीत त्याला संधी मिळाली. वयाच्या शतकाला नऊ कमी असताना लंडनमध्ये तो मृत्यू पावला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply