‘गुणी’ टेलर १९६४ : कसोटी सामन्यांना प्रेक्षणीय, लोकप्रिय आणि निकाली बनविण्यात मोलाचा हातभार लावणार्या एका धुरंधर कर्णधाराचा जन्म. मार्क टेलरने अलन बॉर्डरकडून कप्तानी मिळताच पंधरा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने विंडीजचा पराभव करून फ्रँक वॉरेल चषक जिंकला. प्रमुख गोलंदाजांना गडी बाद होत नसल्याचे दिसताच तो ब्लिवेट, पॉन्टिंग वगैरेंकडे चेंडू सोपवी आणि ते झटकन बळीही मिळवीत. त्याला अनिर्णिणता आवडत नसे. त्याच्या नेतृत्वाखालील ५० सामन्यांपैकी अकराच अनिर्णित राहिले. ‘ढोल्या’ टेलरने प्रेक्षणीयता वाढविली कशी याचा हा ठळक पुरावा आहे. सलामीवीर म्हणून त्याला संघर्ष करावा लागला. १९९५ ते १९९७ दरम्यानच्या काळात २१ डावांमध्ये तो पन्नाशी गाठू शकला नाही. ४३.४९ ही त्याची अंतिम सरासरी मात्र फलंदाज म्हणून त्याच्या श्रेष्ठतेची साक्ष देते.
मुरलीचा दणका २००० : ३० धावांमध्ये ७ बळी. त्यावेळची एकदिवसीय सामन्यांमधील सर्वोत्तम कामगिरी. चेंडूबहाद्दर होता मुथय्या मुरलीदरन आणि प्रतिस्पर्धी (अर्थातच) भारत ! मर्वन अटापट्टू आणि महेला जयवर्धने यांच्या शतकांच्या जोरावर लंकेने ५ बाद २९४ धावा उभारल्या. भारत २ बाद ९९ पर्यंत पोहचलेला असताना मुरली गोलंदाजीस आला आणि केवळ ५० चेंडूंमध्ये अवघ्या २३ धावा मोजत त्याने ७ गडी टिपले. दोनच दिवसांनंतर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय त्याला तुलनेने बरे सामोरे गेले (६ धावात ३ बळी) पण सुमारे अडीचशे धावांनी भारताने…..दो दिन का इंतजार !
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply