पहिला नायक
१८९५ : भारताच्या पहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म. कर्नल कोट्टरी कंकरिया नायडू ड्राईव्ह करण्यात अतिशय पटाईत फलंदाज आणि उपयुक्त मंदगती गोलंदाज होते. भारताने कसोटीचा उंबरठा ओलांडला तेव्हा त्यांचे वय ३६ होते. ते सातच कसोट्या खेळू शकले. त्यांची सर्वोत्तम खेळी त्यांच्या अखेरच्या सामन्यात झाली. ओवलवर १९३६ मध्ये गबी अलनच्या एका चेंडूमुळे सौरगुच्छिकांना (उदराच्या वरच्या भागातील चेतापेशींचा समूह, याला झालेली इजा फार वेदनादायी असते) जोरदार मार लागलेला असूनही ‘जखमी निवृत्त’ होण्यास त्यांनी नकार दिला आणि संयमी ८१ धावा काढीत डावाचा पराभव वाचविला. १९१६ पासून १९६३ पर्यंत (वयाचे ६८वे वर्ष) सहा दशके ते प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. इंदौरमध्ये १९६७ साली त्यांचे निधन झाले.
पहिला त्रिक्रम आणि नवलाचे शतक
१९८७ : विश्वचषक स्पर्धेतील पहिला त्रिक्रम. आपल्या सहाव्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर केन रुदरफोर्ड, इअन स्मिथ आणि इवेन चॅटफिल्डला बाद करीत भारताच्या चेतन शर्माने त्रिक्रम साधला. भारताने या त्रिक्रमाच्या बळावर नागपुरात न्यूझीलंडचा नऊ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाहून सरस गुण मिळवीत उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला २२२ धावांचे उद्दिष्ट ४२.२ षटकांमध्ये गाठणे आवश्यक होते. भारताने हे ३२.१ षटकांमध्येच गाठले. याला कारणीभूत होती विज्डेनच्या म्हणण्यानुसार ’श्वास रोखून धरायला लावणार्या योग्यतेची फलंदाजी’. कृष्णम्माचारी श्रीकांतने ५८ चेंडूंमध्ये ७५ धावा काढल्या पण दिवसाखेर नवलाची गोष्ट वेगळीच राहिली. नवलकथा अशी की, एका फलंदाजाचे धावा काढण्याच्या बाबतीत श्रीकांतशी टक्कर घेत ८५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. १०८ एकदिवसीय सामने खेळलेल्या सुनील गावसकरचे हे एकुलते एक शतक !
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply