ज्येष्ठ अभिनेत्री आशा पोतदार
आशा पोतदार यांना आत्माराम भेंडे यांच्यामुळे ‘नरो वा कुंजरो वा’ या व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचा उपयोग त्यांना अनेकानेक नाटके मिळण्यासाठी झाला. पुढे त्यांनी ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या व्यावसायिक नाटकांतही कामे केली. नंतर १९७१ साली रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘विसर्जन’ या नाटकाचा अनुवाद असलेल्या ‘माते तुला काय हवंय’ या नाटकात त्यांनी काम केले. या नाटकात नानासाहेब फाटक यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. हे नाटक लोकप्रिय झाले आणि या नाटकातील त्यांची भूमिका पाहूनच दिग्दर्शक ना.बा. कामत यांनी ‘प्रेम आंधळं असतं’ (१९६२) या चित्रपटाची नायिका म्हणून त्यांची निवड केली. […]