निसर्गाचा वरदहस्त असलेले पूर्व उत्तरेकडील सर्वात लहान राज्य सिक्कीम ७०९६ स्कवे,किमी विस्तार . ३ लाख लोकवस्ती. नेपाळ, भूतान, चीन देशांच्या सीमांना भिडलेले. सदाबहार हिरवाई. आकाशाला भिडणारी हिमशिखरे. त्तीतसा नदीचे विशाल पात्र,धबधबे,सरोवरे, आणि थंडीत सरोवराचा होणारा बर्फाचा समुद्र. डोळ्याचे पारणे फिटविणारा प्रदेश. येथे जाण्यास गंगटोक हे राजधानीचे शहर गाठावे लागते.उत्तम टॅक्सीची सोय व छाती दडपून टाकणारे घाटाचे रस्ते.गंगटोक उंची ६०००फूट तर नाथूला पास १४६०० फूट. ५५ किमीचा रस्ता. यावर वाटेत ३० किमी वर भव्य चांगु सरोवर. १२३१० फूट उंचीवर पांढऱ्या शुभ्र दगडासारख्या घट्ट बर्फाचा समुद्र पसरलेला होता. ३ ते ५ किमी व्यास असलेल्या सरोवरात पाणी म्हणून दिसत नव्हते.आकाश ढगाळलेले. सूर्य डोकावत होता आणि सरोवराचा काही बर्फ चकाकत होता.भ्रर दुपारी दोन वाजता मी मी म्हणणारी थंडी,बर्फावरून चालण्याचा थोडा प्रयत्न केला पण पावले उचलणे महाकर्मकठीण होते.सरोवराच्या मध्यात एक उंच बांबू दिसत होता.बाकी काही म्हणजे काही दिसत नव्हते.सर्व बाजुनी बर्फ एके बर्फ. तासभर अवाक होऊन पाहात होतो.सर्व बाजूनी बर्फाच्या पांघरुणाने लपेटलेले आकाशाला भिडलेलले डोंगर व मध्यात अस्ताव्यस्त पसरलेला लेक. ना कुठे झाड ना कुठे पाण्याचा भाग,लांबी रूंदीचा अंदाजच करता येत नव्हता.लेकच्या बाजूने चालण्याचा रस्ता.तेथे फिरण्यासाठी ७ ते ८ सजविलेले काळे याक. त्यावर बसून फिरणे म्हणजे एक कसरतच होती.लेकच्या खोल्रीचा अंदाज करणे अशक्यच.उन्हाळ्यात एकदम कायापालट.सरोवराचा परिसर हिरवागार,पाणी इतके नितळ आणि निळे,त्यात बाजूच्या निसर्गाचे रम्य प्रतिबिंब पडते.शेकडो वर्षापूर्वी लामा गुरु पाण्याचा नितळ पणा व आकाशातील विविध रंगछटावरून वरून पुढील काळाचे भविष्य सांगत.
— डॉ. अविनाश केशव वैद्य
Leave a Reply