राम नगरकर हे नाव आपल्यापुढे आलं ते एक नट म्हणून. तेही एक विनोदी नट म्हणून प्रख्यात अभिनेते राम नगरकर यांनी मराठी रंगभूमी आणि असंख्य चित्रपटांमधून लाखो रसिकांना खळखळून हसविले. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९३० रोजी झाला. ‘रामनगरी’ हे त्यांच्या आत्मकथनाचे धम्माल विनोदी पुस्तकही खूप गाजले. महाराष्ट्र शासनासह अनेक संस्थांनी या पुस्तकाला पुरस्कार देऊन गौरविले. ‘रामनगरी’ ला पुलंची प्रस्तावना आहे. त्यामुळेच हे पुस्तक तमाम मराठी जनतेने डोक्यावर घेतले. या पुस्तकावरून ‘रामनगरी’ या हिंदी सिनेमाचीही निर्मिती झाली होती व त्यात अमोल पालेकर हे प्रमुख भूमिकेत होते. हे सर्व होत असताना ‘रामनगरी’ हा एकपात्री कार्यक्रम १९८० साली मा.राम नगरकर यांनी सुरु केला. याचे देशविदेशात एक हजाराहून जास्त प्रयोग केले. त्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा ठसा नेहमीच पाहायला मिळाला. स्वतःची थट्टा-मस्करी करणाऱ्या या कलावंताने आपल्या अदाकारीने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.‘‘ दादा कोंडके, निळू फुले हे नगरकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. १९९५ साली मा.राम नगरकर यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव वंदन नगरकर यांच्यातील कलागुण ओळखून ख्यातनाम अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे वंदन नगरकर यांनी ‘रामनगरी’ ला पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. त्यांनीही रामनगरीचे असंख्य प्रयोग केले आहेत. रामनगरी हे राम नगरकर यांचे आत्मचरित्र खूपच गाजले आहे.
राम नगरकर यांचे ८ जून १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply