नवीन लेखन...

गीत गाता चल !

आपल्याच धुनमध्ये मस्त असलेल्या, बंधनांना नाकारणाऱ्या श्यामची (सचिनचा तारुण्यातील पहिला चित्रपट ) ही गोड कहाणी ! सोबतीला त्याच्यासारखीच पहिले पदार्पण करणारी (व्हाया  बालकलाकार) सारिका ! १९७५ सालचा हा चित्रपट ! आम्ही त्यांच्याच वयोगटातील ! पी.डी . सायन्स ला दयानंदचे विदयार्थी ! सोलापुरातील आशा टॉकीजला लागलेला हा चित्रपट मी पाहिला वैद्य नामक मित्राबरोबर त्याच्या कुटुंबियांसमवेत -बाल्कनीत . प्रचंड आवडला . भारून गेलो -साधी सोपी कथा ! सुंदर संगीत -रवींद्र जैनचं ! जसपाल सिंग आणि आरती मुखर्जी सारखे ताज्या दमाचे सुरेल गायक !

दुसऱ्या दिवशी न राहवून पुन्हा एकटाच गेलो. यावेळी तिकीट मिळाले सगळ्यात पुढच्या रांगेचे ! गम्मत आहे ना ?

[असा प्रकार (थोडासा वेगळा) नंतरही माझ्याबाबतीत घडला. दुपारी १२ ते ३ पुण्यात लक्ष्मी नारायणमध्ये मित्रांसमवेत पहिल्या रांगेत एक चित्रपट (नांव आठवत नाही )आणि त्याच दिवशी रात्री कुटुंबियांसमवेत त्या काळातील नटराजमध्ये (डेक्कन वरील) ” नमकीन ” बाल्कनीत सगळ्यात शेवटच्या रांगेत ! ]

” मैं वही दर्पण वही ” या गाण्याद्वारे वयात येणारी राधा (त्याआधी सतत सचिनशी वयसुलभ वैर धरणारी नटखट सारिका) ते ” कर गया कान्हा मिलन का वादा ” गाणारी घायाळ अभिसारीका ( व्हाया ” श्याम तेरी बन्सी, पुकारे राधा नाम , लोग करे मीराको युंही बदनाम !” मधील मीरा -राधेतील गैरसमजोपरान्त दिलजमाई ) हे स्त्रीच्या पौगंडावस्थेतील टप्पे याआधी इतके सुंदर क्वचितच टिपले गेले असतील.

मीरा हे श्यामशी जोडलं गेलेलं एक अविभाज्य नांव आणि नातंही ! राधा आणि मीरेच्या उल्लेखाशिवाय श्याम अधुरा आहे. इथे तीही आहे -कथानकात फारशी लुडबूड न करणारी दूरवरची लोभसवाणी मीरा ! (प्रत्यक्षातही मीरा नेहेमी दूरच असते.)

” गीत गाता चल ” पासून  “धरती मेरी माता ” आणि “मंगल भवन अमंगल हारी ” पर्यंत  श्याम चे कॅरेक्टर छान रंगते. शेवटचा पदर आहे, श्यामला वठणीवर आणणाऱ्या पद्मा खन्ना चा ! तिच्या नौटंकीत दोन गाणी म्हणतो श्याम, पण दरम्यान त्याच्यात खूप बदल झालेला असतो. “मोहे छोटा मिला भरतार “च्या वेळी ( चित्रपटाच्या सुरुवातीला ) अल्लड ,निरागस असलेला श्याम ” श्याम अभिमानी ” पर्यंत पोहोचताना अंतर्बाह्य गोंधळलेला, स्वशोधापर्यंत ठेपलेला असतो. दीदी (पद्मा खन्ना) त्याचा कान हक्काने उपटते आणि त्याला सगळं उमगते. नदी /वारा /आकाश यांच्या हाकांना ओ देत निघालेल्या, पिंजरा नाकारणाऱ्या  श्यामला मंझिल मिळते.

संगीतमय चित्रपट करण्याचे सारे श्रेय रवींद्र जैनचे ! एक गोड ,हवाहवासा वाटणारा अनुभव आपण जतन करून ठेवतो. किती सरळ एका रेषेतील कहाणी -थोडया वाटा वळणांनंतर आपल्या धामी पोहोचते.

हे सारं आत्ताच आठवायचं कारण म्हंणजे परवा ” भोजपुर आणि भीमबेटकाला “जाताना शिवगुंडेच्या वाहनचालकाने आख्खा “गीत गाता चल ” कारमध्ये ऐकवला आणि मन १९७५ मध्ये शिरलं !

अजून तिथेच आहे.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..