आपल्याच धुनमध्ये मस्त असलेल्या, बंधनांना नाकारणाऱ्या श्यामची (सचिनचा तारुण्यातील पहिला चित्रपट ) ही गोड कहाणी ! सोबतीला त्याच्यासारखीच पहिले पदार्पण करणारी (व्हाया बालकलाकार) सारिका ! १९७५ सालचा हा चित्रपट ! आम्ही त्यांच्याच वयोगटातील ! पी.डी . सायन्स ला दयानंदचे विदयार्थी ! सोलापुरातील आशा टॉकीजला लागलेला हा चित्रपट मी पाहिला वैद्य नामक मित्राबरोबर त्याच्या कुटुंबियांसमवेत -बाल्कनीत . प्रचंड आवडला . भारून गेलो -साधी सोपी कथा ! सुंदर संगीत -रवींद्र जैनचं ! जसपाल सिंग आणि आरती मुखर्जी सारखे ताज्या दमाचे सुरेल गायक !
दुसऱ्या दिवशी न राहवून पुन्हा एकटाच गेलो. यावेळी तिकीट मिळाले सगळ्यात पुढच्या रांगेचे ! गम्मत आहे ना ?
[असा प्रकार (थोडासा वेगळा) नंतरही माझ्याबाबतीत घडला. दुपारी १२ ते ३ पुण्यात लक्ष्मी नारायणमध्ये मित्रांसमवेत पहिल्या रांगेत एक चित्रपट (नांव आठवत नाही )आणि त्याच दिवशी रात्री कुटुंबियांसमवेत त्या काळातील नटराजमध्ये (डेक्कन वरील) ” नमकीन ” बाल्कनीत सगळ्यात शेवटच्या रांगेत ! ]
” मैं वही दर्पण वही ” या गाण्याद्वारे वयात येणारी राधा (त्याआधी सतत सचिनशी वयसुलभ वैर धरणारी नटखट सारिका) ते ” कर गया कान्हा मिलन का वादा ” गाणारी घायाळ अभिसारीका ( व्हाया ” श्याम तेरी बन्सी, पुकारे राधा नाम , लोग करे मीराको युंही बदनाम !” मधील मीरा -राधेतील गैरसमजोपरान्त दिलजमाई ) हे स्त्रीच्या पौगंडावस्थेतील टप्पे याआधी इतके सुंदर क्वचितच टिपले गेले असतील.
मीरा हे श्यामशी जोडलं गेलेलं एक अविभाज्य नांव आणि नातंही ! राधा आणि मीरेच्या उल्लेखाशिवाय श्याम अधुरा आहे. इथे तीही आहे -कथानकात फारशी लुडबूड न करणारी दूरवरची लोभसवाणी मीरा ! (प्रत्यक्षातही मीरा नेहेमी दूरच असते.)
” गीत गाता चल ” पासून “धरती मेरी माता ” आणि “मंगल भवन अमंगल हारी ” पर्यंत श्याम चे कॅरेक्टर छान रंगते. शेवटचा पदर आहे, श्यामला वठणीवर आणणाऱ्या पद्मा खन्ना चा ! तिच्या नौटंकीत दोन गाणी म्हणतो श्याम, पण दरम्यान त्याच्यात खूप बदल झालेला असतो. “मोहे छोटा मिला भरतार “च्या वेळी ( चित्रपटाच्या सुरुवातीला ) अल्लड ,निरागस असलेला श्याम ” श्याम अभिमानी ” पर्यंत पोहोचताना अंतर्बाह्य गोंधळलेला, स्वशोधापर्यंत ठेपलेला असतो. दीदी (पद्मा खन्ना) त्याचा कान हक्काने उपटते आणि त्याला सगळं उमगते. नदी /वारा /आकाश यांच्या हाकांना ओ देत निघालेल्या, पिंजरा नाकारणाऱ्या श्यामला मंझिल मिळते.
संगीतमय चित्रपट करण्याचे सारे श्रेय रवींद्र जैनचे ! एक गोड ,हवाहवासा वाटणारा अनुभव आपण जतन करून ठेवतो. किती सरळ एका रेषेतील कहाणी -थोडया वाटा वळणांनंतर आपल्या धामी पोहोचते.
हे सारं आत्ताच आठवायचं कारण म्हंणजे परवा ” भोजपुर आणि भीमबेटकाला “जाताना शिवगुंडेच्या वाहनचालकाने आख्खा “गीत गाता चल ” कारमध्ये ऐकवला आणि मन १९७५ मध्ये शिरलं !
अजून तिथेच आहे.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply