प्रथम मलेरिया या शब्दाची फोड म्हणजे साचलेले पाणी व पाण्याच्या डबक्या तून निघणारे विषारी वायू अशी केली जात असे. इटालियन शब्द मलेरिया (Mala-दूषित, aria-हवा) म्हणजेच Mal’aria या शब्दापासून Malaria असा शब्द तयार झाला.
इ. स. १७४० मध्ये या विशिष्ट ज्वराला मलेरिया हे नाव इंग्लिश लेखक होरेस वाम्पोत्र यांनी दिले. इ.स. १७४३ मध्ये जॅक्वीयर व इ.स. १७५० मध्ये टॉर्टी यांच्या ग्रंथात मलेरिया या संज्ञेचा उल्लेख आहे.
क्रिस्टोफर कोलंबस आपल्या आफ्रिकन गुलामांसह अमेरिकेत मलेरिया घेऊन आले आणि त्याचा तेथे झपाट्याने प्रसार झाला. अमेरिकन यादवी युद्ध काळात ५० टक्के गोरे ८० टक्के नागरिक मलेरियाग्रस्त होते.
पुढील तीन शतके जसजसा व्यापार व देशादेशांमधील युद्ध वाढत गेली तसतसा मलेरियाचा प्रसार जगभर झाला. एकोणिसाव्या शतकात तर मलेरियामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या इतकी होती की दर दहा मलेरियाग्रस्त रुग्णांपैकी एकाचा मृत्यू अटळ होता. जगाचा इतिहास पाहताना मलेरियामुळे गेल्या तीन ते चार हजार वर्षात लक्षावधी लोकांचे बळी घेतले गेले आहेत. त्यामधील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची जंत्री बरीच मोठी आहे. मलेरिया सदृश्य ताप व त्याचे शरीरावर झालेले दुष्परिणाम यावरील निदानावरून हा मलेरियाचा रोगी होता असा निव्वळ तर्कच आहे, कारण त्या काळात परोपजीवींचा शोधही लागलेला नव्हता. तसेच डास व मनुष्य यांचे आपापसातील नातेही ठामपणे सिद्ध झालेले नव्हते. परंतु देश आदेशाप्रमाणे विविध पद्धती त्या काळात वापरल्या जात असत.
– डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply