नवीन लेखन...

निजामपूर-कुंभा धरण परिसर …. गूढरम्य सह्याद्री

निजामपूर-कुंभा धरण परिसर ….
गूढरम्य सह्याद्री – जिल्हा रायगड
अतुल्य भारत … Incredible India

माझा एक मामा श्रीवर्धनला राहातो. बहुतेक पाच एक वर्षांपूर्वी … एकदा… सरत्या पावसाच्या दिवसात … मी आणि अंजली गाडी घेऊन मामाकडे गेलो. रात्री मुक्काम दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो. वाटेतल्या माणगावला राष्ट्रीय महामार्ग क्रॉस करून आतल्या रस्त्याने निजामपूर-पाली मार्गाने ठाण्याला निघालो. निजामपूर हे माझ्या आजोळचं मूळ गाव असल्याने आणि मी तिथे कधीही न गेल्याने मनात कित्येक वर्ष ते रुंजी घालत होतं. सकाळचे दहा वाजले असताना निजामपूरच्या अगोदर रस्त्याच्या कडेला … शांत जागी एक साधं स्वच्छ हॉटेल दिसल्याने थांबलो. तिथून मागे सह्याद्रीच्या … ढगांनी वेढलेल्या डोंगररांगांचा विशाल देखावा दिसत होता. न्याहारी झाल्यावर मी हॉटेलच्या मालकांना विचारलं की हे डोंगर कुठचे … ते म्हणाले की तिथे कुंभा धरण आहे आणि त्या पलीकडच्याबाजूला आहे लवासा. मी म्हटलं की तिथे गाडी जाते का … तर म्हणाले होय … अगदी डोंगरमाथ्यावर गाडी जाते … रस्ता मात्र अरुंद ….. खाच खळग्यांचा … आणि वळणावळणाच्या बेलाग घाटाचा आहे. अर्ध्या वाटेपर्यंत बस जाते.. पुढे मात्र नाही … मी निजामपूरला राहणाऱ्या माझ्या एका चुलत मामाचा रेफरन्स सांगितला … मग काय ते म्हणाले … अरे तुम्ही आमचेच आहात …. तुम्ही जाणार असाल तर मी तुमच्या बरोबर एक मुलगा देतो … जाताना त्याला परत इथे सोडा …. आम्ही खुश झालो … आणि डेरिंग करून गाडी त्या घाटात घातली … आणि कुंभा धरणाच्या जवळ पोचलो… वरती पोचेस्तवर … वाटेत औषधालाही एकही गाडी दिसली नाही ….. वरती प्रचंड धुकं … ढगांचं साम्राज्य … आणि पाऊस … तरीही आम्ही उतरलो आणि तासभर वरती त्या अतोनात वारा … थंडी असलेल्या प्रदेशात फिरलो…. तिथे वरती छोटया छोटया वस्तीच्या वाडया आहेत. खाली आल्यावर मी मोठया उत्साहात वर्णन केल्यावर हॉटेलचे मालक म्हणाले … तिथे जमीन हवी असेल तर सांगा … तुम्ही आमच्या निजामपूरचेच आहात … मी म्हटलं विचार करतो…. त्यांचा नंबर घेतला आणि ठाणे गाठलं.

पण तो परिसर … सह्याद्रीच्या त्या डोंगररांगा … तिथली शांतता … काही मनातून जाईना … आम्हा दोघांच्याही. माझे अतिशय जवळचे प्रिय मित्र … अनंत घोसाळकर … हे निवृत्त झाल्यावर त्यांच्या माणगावजवळच्या गावात … ‘उसर’ला राहातात … त्यांना फोन करून कुंभ्याबद्दल सांगितलं .. आणि जमिनींचंही … ते यात खूप अनुभवी … माहितगार … म्हणाले तुम्ही परत या … त्या गृहस्थांना मी ओळखतो … परत पुढच्या रविवारी आम्ही दोघं गेलो … घोसाळकर माणगावला आले … त्यांना गाडीत घेतलं आणि परत कुंभा गाठलं .. अर्थात या वेळी त्या हॉटेल मालकांनी त्यांचा वेगळा माणूस दिला … वरती गेल्यावर तेच वातावरण … प्रचंड धुकं … थंडी .. वारा .. आणि ढग … त्या माणसाने आम्हाला खूप जमिनी दाखवल्या … आम्ही परत घरी आलो …

नंतर पुढच्या महिन्यात आम्ही आमच्या ट्रेकर्स ग्रुपचा ट्रेक ठरवला .. पहिला मुक्काम उसरला … घोसाळकरांच्या घरी … दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून … त्याच हॉटेलात न्याहारी करून आम्ही कुंभ्याला गेलो … या वेळी त्या हॉटेल मालकांना विनंती केली की आम्हाला निजामपुरातून कुंभ्यापर्यंत सोडायला वाहन हवं आहे … आम्हाला येताना चालत यायचंय .. ते म्हणाले तुम्ही एवढं चालणार … मी म्हटलं होय …. आता काय ओळख झाली होती … त्यांनी वाहनांची व्यवस्था केली … आम्ही आमच्या गाडया त्यांच्याच हॉटेलत ठेवल्या … कुंभ्याला गेलो … त्या ढगातून … धुक्यातून वरती डोंगरमाथ्यावर खूप चाललो आणि येताना निजामपूरपर्यंत पायी चालत आलो … अविस्मरणीय अशीच ती ट्रिप होती …

अगदी एक दीड महिन्याच्या कालावधीत आम्ही तीन वेळा तिथे गेलो … ठाण्याहून हे अंतर कमी नाहीये … पावसाच्या दिवसात …  स्वतःच्या मोटारीने तिथे पोचायला सहज चार साडेचार तास तरी किमान लागतात… इतकी ओढ कुंभ्याच्या त्या सह्याद्रीने … तिथल्या भन्नाट … विराट … धुंद कुंद निसर्गाने लावली … आजही कुंभा हे नुसतं नाव जरी मनात आलं तरी मन प्रसन्न होतं … आताही ते रुंजी घालतंय … शेवटी जमीन काही घेतली नाही … कारण या वयात एखादया व्यवहारात जो कंफर्ट मनाला आपसूक जाणवतो … तो नाही जाणवला .. म्हणजे वनखात्याची जमीन असेल का .. बाजूलाच धरण आहे … त्याचा काही कायदेशीर इम्पॅक्ट असेल का …. आणि तिथे काही म्हणजे काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं … त्या वेळी … अर्थात म्हणूनच मला घ्यायची होती …पण असं असलं तरी आता हे लिहितानाही वाटतंय की जावं आणि थोडी जमीन तिथे घेऊन छोटंसं घर बांधावं … पावसात … निसर्गाचे अतिविराट अविष्कार तिथून बघत राहावं … वेडया सारखा अखंड कोसळणारा पाऊस बघावा … त्यात रोज काही तास फिरावं …. आजही ती ओढ तेवढीच आहे … हे खरं …

डोंगरमाथा … !

 

डोंगरमाथ्यावरून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर …!

 

डोंगरमाथा … !

 

परम मित्र अनंत घोसाळकर यांचं ‘उसर’ इथलं घर …. हे गाव देखील समृद्ध निसर्गाने वेढलेलं असून आपल्याला कल्पना करता येणार नाही एवढं निबिड अरण्य गावाला वेढून आहे

 

— प्रकाश पिटकर

Image © Prakash Pitkar….

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..