निजामपूर-कुंभा धरण परिसर ….
गूढरम्य सह्याद्री – जिल्हा रायगड
अतुल्य भारत … Incredible India
माझा एक मामा श्रीवर्धनला राहातो. बहुतेक पाच एक वर्षांपूर्वी … एकदा… सरत्या पावसाच्या दिवसात … मी आणि अंजली गाडी घेऊन मामाकडे गेलो. रात्री मुक्काम दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो. वाटेतल्या माणगावला राष्ट्रीय महामार्ग क्रॉस करून आतल्या रस्त्याने निजामपूर-पाली मार्गाने ठाण्याला निघालो. निजामपूर हे माझ्या आजोळचं मूळ गाव असल्याने आणि मी तिथे कधीही न गेल्याने मनात कित्येक वर्ष ते रुंजी घालत होतं. सकाळचे दहा वाजले असताना निजामपूरच्या अगोदर रस्त्याच्या कडेला … शांत जागी एक साधं स्वच्छ हॉटेल दिसल्याने थांबलो. तिथून मागे सह्याद्रीच्या … ढगांनी वेढलेल्या डोंगररांगांचा विशाल देखावा दिसत होता. न्याहारी झाल्यावर मी हॉटेलच्या मालकांना विचारलं की हे डोंगर कुठचे … ते म्हणाले की तिथे कुंभा धरण आहे आणि त्या पलीकडच्याबाजूला आहे लवासा. मी म्हटलं की तिथे गाडी जाते का … तर म्हणाले होय … अगदी डोंगरमाथ्यावर गाडी जाते … रस्ता मात्र अरुंद ….. खाच खळग्यांचा … आणि वळणावळणाच्या बेलाग घाटाचा आहे. अर्ध्या वाटेपर्यंत बस जाते.. पुढे मात्र नाही … मी निजामपूरला राहणाऱ्या माझ्या एका चुलत मामाचा रेफरन्स सांगितला … मग काय ते म्हणाले … अरे तुम्ही आमचेच आहात …. तुम्ही जाणार असाल तर मी तुमच्या बरोबर एक मुलगा देतो … जाताना त्याला परत इथे सोडा …. आम्ही खुश झालो … आणि डेरिंग करून गाडी त्या घाटात घातली … आणि कुंभा धरणाच्या जवळ पोचलो… वरती पोचेस्तवर … वाटेत औषधालाही एकही गाडी दिसली नाही ….. वरती प्रचंड धुकं … ढगांचं साम्राज्य … आणि पाऊस … तरीही आम्ही उतरलो आणि तासभर वरती त्या अतोनात वारा … थंडी असलेल्या प्रदेशात फिरलो…. तिथे वरती छोटया छोटया वस्तीच्या वाडया आहेत. खाली आल्यावर मी मोठया उत्साहात वर्णन केल्यावर हॉटेलचे मालक म्हणाले … तिथे जमीन हवी असेल तर सांगा … तुम्ही आमच्या निजामपूरचेच आहात … मी म्हटलं विचार करतो…. त्यांचा नंबर घेतला आणि ठाणे गाठलं.
पण तो परिसर … सह्याद्रीच्या त्या डोंगररांगा … तिथली शांतता … काही मनातून जाईना … आम्हा दोघांच्याही. माझे अतिशय जवळचे प्रिय मित्र … अनंत घोसाळकर … हे निवृत्त झाल्यावर त्यांच्या माणगावजवळच्या गावात … ‘उसर’ला राहातात … त्यांना फोन करून कुंभ्याबद्दल सांगितलं .. आणि जमिनींचंही … ते यात खूप अनुभवी … माहितगार … म्हणाले तुम्ही परत या … त्या गृहस्थांना मी ओळखतो … परत पुढच्या रविवारी आम्ही दोघं गेलो … घोसाळकर माणगावला आले … त्यांना गाडीत घेतलं आणि परत कुंभा गाठलं .. अर्थात या वेळी त्या हॉटेल मालकांनी त्यांचा वेगळा माणूस दिला … वरती गेल्यावर तेच वातावरण … प्रचंड धुकं … थंडी .. वारा .. आणि ढग … त्या माणसाने आम्हाला खूप जमिनी दाखवल्या … आम्ही परत घरी आलो …
नंतर पुढच्या महिन्यात आम्ही आमच्या ट्रेकर्स ग्रुपचा ट्रेक ठरवला .. पहिला मुक्काम उसरला … घोसाळकरांच्या घरी … दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून … त्याच हॉटेलात न्याहारी करून आम्ही कुंभ्याला गेलो … या वेळी त्या हॉटेल मालकांना विनंती केली की आम्हाला निजामपुरातून कुंभ्यापर्यंत सोडायला वाहन हवं आहे … आम्हाला येताना चालत यायचंय .. ते म्हणाले तुम्ही एवढं चालणार … मी म्हटलं होय …. आता काय ओळख झाली होती … त्यांनी वाहनांची व्यवस्था केली … आम्ही आमच्या गाडया त्यांच्याच हॉटेलत ठेवल्या … कुंभ्याला गेलो … त्या ढगातून … धुक्यातून वरती डोंगरमाथ्यावर खूप चाललो आणि येताना निजामपूरपर्यंत पायी चालत आलो … अविस्मरणीय अशीच ती ट्रिप होती …
अगदी एक दीड महिन्याच्या कालावधीत आम्ही तीन वेळा तिथे गेलो … ठाण्याहून हे अंतर कमी नाहीये … पावसाच्या दिवसात … स्वतःच्या मोटारीने तिथे पोचायला सहज चार साडेचार तास तरी किमान लागतात… इतकी ओढ कुंभ्याच्या त्या सह्याद्रीने … तिथल्या भन्नाट … विराट … धुंद कुंद निसर्गाने लावली … आजही कुंभा हे नुसतं नाव जरी मनात आलं तरी मन प्रसन्न होतं … आताही ते रुंजी घालतंय … शेवटी जमीन काही घेतली नाही … कारण या वयात एखादया व्यवहारात जो कंफर्ट मनाला आपसूक जाणवतो … तो नाही जाणवला .. म्हणजे वनखात्याची जमीन असेल का .. बाजूलाच धरण आहे … त्याचा काही कायदेशीर इम्पॅक्ट असेल का …. आणि तिथे काही म्हणजे काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं … त्या वेळी … अर्थात म्हणूनच मला घ्यायची होती …पण असं असलं तरी आता हे लिहितानाही वाटतंय की जावं आणि थोडी जमीन तिथे घेऊन छोटंसं घर बांधावं … पावसात … निसर्गाचे अतिविराट अविष्कार तिथून बघत राहावं … वेडया सारखा अखंड कोसळणारा पाऊस बघावा … त्यात रोज काही तास फिरावं …. आजही ती ओढ तेवढीच आहे … हे खरं …
— प्रकाश पिटकर
Image © Prakash Pitkar….
Leave a Reply