राम : ( सीताहरण झाल्यानंतर रामांचा विलाप) –
हे खग, मृग, हे तरुवर श्रेणी, हे अंबर अवनी
पाहिलीत कां सांगा कोणी सीता मृगनयनी ? १
मम सीता सौंदर्यखनी ।।
लावण्याची अनुपम मूर्ती
फिके तिजपुढे कांचन, मोती
पूर्णेंदूसम आभा वदनीं, घाली मज मोहिनी ।। २
जिला वराया धनू भंगलें
जनकसुतेनें हृदय जिंकलें
नभिंची ती दामिनी, जाहली रामाची स्वामिनी ।। ३
गर्भरेशमी वस्त्र त्यागुनी
वल्कल ल्याली राजनंदिनी
दिसे शोभुनी अधिक त्यांमधें दीप्त अप्सरेहुनी ।। ४
पर्णकुटी प्रासाद कराया
तिला आगळी अवगत माया
भेटे रात्रंदिनीं अयोध्या तिच्यामुळें विपिनीं ।। ५
एकलाच मज येउं देइना
हट्टच धरला संगें येण्यां
कैसी लपली आतां, लोटुन मला एकटेपणीं ? ६
तिजविण राघव निरर्थ आहे
जीवन तिच्यामुळे सार्थ आहे
व्यापुन टाकी अस्तित्वा माझी जीवनसंगिनी ।। ७
ज़ळे पालवी भाग्यद्रुमाची
नुरे पाकळी सुखकुसुमाची
वेरहवेदनाकाट्यांनी झालो घायाळ मनीं ।। ८
मरस्थलासम जीवन भासे
क्षणाक्षणाला ऊष्ण उसासे
क्लेशआतपीं सुकून गेलें नयनींचें पाणी ।। ९
अस्तित्वाचा स्रोत आटला
कंठीं व्याकुळ प्राण दाटला
फुंक चेतना ईशा, देउन सीता-संजीवनी ।। १०
– सुभाष स. नाईक
Leave a Reply