मेमरी म्हणजे स्मरणशक्ती . मेमरी ड्राईंग किंवा ‘ स्मरणचित्र ‘ , चित्रकलेच्या पहिल्या दुसऱ्या परीक्षांना असते . स्मरणपत्र म्हणजे आठवण करून देणारे पत्र . ‘ स्मरणिका ‘ म्हणजे ‘ सूव्हनिअर ‘ ( souvenir ) ‘ आठवण ‘ राहावी म्हणून प्रकाशित केलेली पुस्तिका , ‘ टु कमिट्टु मेमरी ‘ म्हणजे तोंडपाठ करणे . पण ‘ टु हॅव ए मेमरी लाइक सीव्ह ( sieve = चाळण ) म्हणजे आठवणीत न राहणे प्रातःस्मरण , ईशस्मरण म्हणजे शक्ती व आनंद . न्यूरॉलॉजिस्टस् असे म्हणतात की , आवाज हा घुसखोर आहे . त्याची मेमरी दरारा बसविणारी असते . ते पुढे म्हणतात की , ऐकण्याचा मनावर होणारा परिणाम ५ सेकंदपर्यंत टिकतो . तर दृश्याचा परिणाम एक सेकंदभर टिकतो . सकाळी फिरायला गेलो होतो रस्त्यावरच्या एका वर्कशॉपमध्ये दादा वेल्डिंगवाला वेल्डिंग करत होता . मी म्हणालो , ‘ ओळख नाही दिलीत , विसरलात वाटतं .
त्याने क्षणभरच माझ्याकडे बघितले आणि म्हणाला ‘ आमची मेमरी स्ट्राँग हाये , विसरलो न्हाय . तुमची निळी अँम्बेसिडॉर व्हती ना एम एच . पी . ३५५२. ‘ मी थक्क झालो दादाची आठवण पाहून . अशी ही नंबर लक्षात ठेवण्याची मेमरी विशेषतः पोलिस व डिटेक्टिव्ह यांना असते .
भोजराजाच्या वेळी एकपाठी , द्विपाठी आणि त्रिपाठी असे लोक असत . कोणताही नवकवी आपली कविता दरबारात गाऊ लागला की , एकपाठी म्हणे , ‘मला माहीत आहे ही कविता . ‘ आणि ती तो गाऊन दाखवी . मग द्विपाठीही म्हने , ‘ मला पण माहीत आहे . असेच त्रिपाठी पण करे . नवकवीचा उत्साहच मावळून जात असे . यावर कालिदासाने कसा मार्ग काढला . ही गोष्ट वेगळी . एवढे मात्र निश्चित की , मानवी मेंदूमध्ये कुठे तरी , कसे तरी ‘ संग्रहित ‘ केले जाते . ते नेमक्या वेळी पुढे येते . कसे ते नक्की माहित नाही .
एकदा बघितलेला माणूस आपण विसरत नाही . त्याचा आवाज , चेहरा ,स्पर्श ( झाला असल्यास ) वास म्हटले तर अतिशयोक्ति होईल , सगळेच्या सगळे , पुरे पुरे आठवणीत राहते त्यासाठी काही प्रयासही करावे लागत नाहीत . अर्थात , आठवण्याचा प्रयत्न करणे ( रिकॉल ) ही मेमरी वाढविण्याची एक पद्धत आहे यात शंकाच नाही . मेमरी नसती तर , ‘ इन मेमरी ऑफ ‘ , मेमोरिअल , स्मृतिचिन्हे स्मृति – स्मारके , जन्मदिन , स्मरणदिन पुण्यतिथी असे शब्द आलेच नसते . मग , मासिकात , वर्तमानपत्रात भरगच्च कार्यक्रम कसे छापणार ? सगळे जगच मेमरीमुळे चालले आहे .
जाहिरातकला तर संपूर्ण ‘ मेमरी ‘ वर अवलंबून आहे . या कलेचे तत्त्व काय तर , जाहिरातीतील विषय संबंधित वस्तू गि – हाइकाला विकत घेतानाच्या वेळी , नेमका पुढे आला पाहिजे . तो ब्रँड , ते स्लोगन , ते जिंगल आठवून तो म्हणाला पाहिजे व्हिडिओकॉनचे नवे मॉडेल दाखवा . सगळ्या जाहिरातींच्या मागे प्रचंड विश्वास व ताबडतोब सुख देण्याची कल्पना असते .
ईश्वराने माणसाला ‘ मेमरी ‘ ही फार मोठी ठेव दिलेली आहे . माणसे वस्तू कशा ओळखतात ? एकमेकांना कसे ओळखतात ? दृष्टीस पडल्यावर प्रतिमा जपून कशा ठेवतात ? वाचतात कसे ? भाषा कशी अवगत करतात ? नवीन माहिती स्मरणात कशी ठेवतात ? या मेंदूच्या गोष्टी जाणण्याचा डॉक्टर्सना , विशेषतः न्यूरॉलॉजिस्टसना एक छंदच असतो . आणि छंदामुळेच न्यूरोसायन्स तयार झाले .
१८७४ सालची गोष्ट . कार्ल वेर्निके ( Carl Wernicke ) नावाचा एक जर्मन न्यूरोपॅथॉलजिस्ट होता . भाषा कळण्याकरिता मेंदूत एक जागा असते . असे त्याने शोधून काढले . ऐकलेले आणि -बघितलेले जे काही असते , त्याचा परिणाम मेंदूतील या ‘ वेर्निके ‘ क्षेत्रात होतो . जेव्हा माणसाला अर्थबोध होत नाही किंवा तो अर्थशून्य बोलतो किंवा त्याला अर्थपूर्ण वाक्ये लिहिता येत नाहीत , तेव्हा समजावे की याला ‘ वेर्निकेचा ‘ वाचाशक्तीनाश ( Wernicke’s Aphasia ) होण्याचा संभव आहे . मुख्यतः त्याला वाक्यरचना ( syntax ) करता येत नाही . मनुष्य मेमरीतूनच बोलतो . होते काय की बोलताना , वेर्निके क्षेत्रातील न्यूरल सिस्टिम्स अर्थपूर्ण शब्द निवडतात .
ते शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर आहेत की नाही हे ‘ ब्रोका ‘ क्षेत्रात ( Broca’s Area ) ठरते . मग ही माहिती मोटर कॉर्टेक्स ( Motor Cortex ) मध्ये जाऊन तोंड उघडले जाते , म्हणजेच शब्द फुटतात . १८६१ मध्ये फ्रेंच शस्त्रवैद्य व मानवशास्त्रज्ञ पॉल ब्रोका ( Paul Broca ) याने असे शोधून काढले की , मेंदूच्या डाव्या भागात अशी एक जागा आहे की , जेथून स्पष्ट उच्चार येऊ शकतात . जर माणसाला ब्रोकाझ अफेसिया ( Broca’s Aphasia ) झाला असेल तर तो स्पष्ट बोलू शकत नाही .
सांगायचे काय तर ‘ मेमरीचे शास्त्र ‘ साधेसुधे नाही . मेमरीच झटकन औदास्य , खिन्नता , दुर्बलता , पोकळी वगैरे निर्माण करते . तीच आपल्याला खुदकन गाली हसविते व रंजन करते . वेळच्या वेळी आठवले नाही की शरीरावर भीतीचा काटा येतो . ‘ मसल ‘ मधील एनर्जी गेल्यासारखी वाटते . ‘ मसल ‘ मधील लॅक्टिक अॅसिड ‘ कमी होऊन ‘ स्टेडी स्टेट ‘ बिघडते . तसे म्हणायचे झाले तर मेमरी सेंट्रल ‘ नर्व्हस सिस्टिम वर अवलंबून आहे . नर्व्हस इंपल्स ‘ पोहोचावा म्हणून सिनॅप्स ( synapse ) हे जंक्शन असते . तिथेच सिनॅपटिक डीले ( synaptic delay ) . अर्थात् तसा ज्ञानाचा आणि तांत्रिक शब्दांचा उपयोग नाही . न्यूरॉलॉजिस्ट्स काय करायचे ते करतील . पण , आपण पौष्टिक अन्न घ्यावे , मोकळा स्वभाव ठेवावा आणि सुखाने जगावे – म्हणजे स्मरणशक्ती शाबूत राहते .
‘अय्या ! मीठच घालायला विसरले पोह्यात , सॉरी हं ! ‘ असे तात्पुरती मेमरी गेल्याचे उद्गार आपल्याला हसवतातच ‘ विसरणे ‘ हे अगदी साहजिक आहे असे मानावे . कोणी काही मुद्दाम करत नाही .
औषधाच्या दुकानावर मी गेलो होतो आणि डोमस्टाल्ट हा शब्द आठवेना . एकदम गायब ! मग पायऱ्या उतरून येऊ लागलो , इतक्यात आठवला . मी स्वतःशीच बावळटपणे हसलो , ‘ मेमरी जाणं फार फार वाईट . ‘
कधीही विसरू नका ! फरक असतो तो गट्समध्ये , मेमरी आहे म्हणण्यात .
-सुरेश परुळेकर ,
संगमनेर .
Leave a Reply