भाग-१-ड
भारताच्या बर्याच भागात मुघल काळात फारसी राजभाषा होती. तसं पहिलं तर कुतुबुद्दीन ऐबक पासून म्हणजे इसवी सन १२०६ पासून ते १८५७ पर्यंत अशी ७॥ शतकं भारताच्या बर्याच भागात अरबी-फारसी-तुर्की इत्यादी भाषांना मान होता. महाराष्ट्रात शिवाजीपर्यंत व कर्नाटकात विजयनगरच्या काळापर्यंत ह्याच भाषांचं राजकीय प्राबल्य होतं. पण त्यामुळे भारतीय भाषांचं अस्तित्व लोपलं नाही, कारण त्या लोकभाषा होत्या, सर्वसाधारण जनता त्यांचाच उपयोग करत होती – त्या इथल्या लोकांच्या मातृभाषा होत्या व आहेत, म्हणून त्या टिकून राहिल्या.
एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की राज्यकर्त्यांना राज्य करायचं असतं. त्यांचं लक्ष्य वेगळं असतं. लोकभाषेला नामशेष करायचा प्रयत्न ते कशाला करतील? औरंगजेबासारख्या कट्टर धर्माभिमानी राजानंही ते केलं नाहीं. इंग्रजांनीही ते राज्यकर्ते असतांना तसा प्रयत्न केला नाही आणि केला असता, तर तो असफल झाला असता. आणि इंग्रजी राजभाषा असतांना जे करूं शकली नाहीं, ते आज ती कशी करू शकेल? जे राजसत्तेचं तेंच अर्थसत्तेचंही आहे.
माझे मित्र श्री. निशिगंध देशपांडे आपल्या एका लेखात म्हणतात की, अर्थकारणामुळे भाषा नष्ट होऊ शकते. माझ्याशी बोलतांना त्यांनी त्यासाठी आदिवासींचं उदाहरणही दिलं होतं. भारतीय आदिवासींची भाषा नष्ट झाली काय याचा शोध घ्यायला हवा. (मी याबद्दल साशंक आहे. पण तसं झालं असल्यास, त्याचं कारण वेगळंच असणार आहे , असं मला वाटतं) .
भाषा नष्ट होऊ शकते ती मुख्यत्वे राजकीय किंवा आर्थिक कारणांमुळे नव्हें. तर मुख्यत्वे सांस्कृतिक कारणांमुळे. आम्ही जर आमची संस्कृती सोडली, तर आमची भाषा नष्ट होऊ शकेल. परंतु आमची संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे. आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे. आमच्या उच्चवर्णियांनी जरी पाश्चिमात्त्य संस्कृतीतल्या कांही गोष्टी स्वीकारल्या असल्या, तरी तो संस्कृतींचा मिलाप समजायला हवा.
आमची संस्कृती नष्ट होत चालली आहे असं आमचे विचारवंत म्हणतात. पण इतिहास वेगळंच चित्र दाखवतो. परदेशी विद्वानही म्हणतात की भारतीय वांशिक समुह आपल्या संस्कृतीचं वेगळेपण नेहमी जपत असतो. म्हणूनच आमची संस्कृती व आमची भाषाही नष्ट होण्याचा पुढलया शतकात तरी कांहींहीं संभव दिसत नाहीं.
**
(पुढे चालू)
— सुभाष स. नाईक
Leave a Reply