गुरुदेव ,
सांस्कृतिक संचित असणारे आपले प्रेरणादायी शिल्प , धर्मांधांनी नंगानाच करताना उद्ध्वस्त केले .
उन्मादाच्या नशेत झिंगून आपल्या विकृतीचे भयंकर प्रदर्शन करताना , मांडलेले थैमान सर्वांना भयकंपित करणारे होते . विच्छिन्न झालेले ते शिल्प पाहताना यातनांनी तडफडणाऱ्या आपल्या आत्म्याला किती भयंकर क्लेश झाले असतील याची कल्पना सुध्दा करता येत नाही .
गुरुदेव ,
आपल्या शिल्पावर पहिला घाव पडला तेव्हा … खरं सांगा गुरुदेव , आपल्या मनात हेच आलं असेल ना , की या सर्वांना परमेश्वराने माफ करावं .
खरं आहे ना ?
कारण आपली वृत्ती आध्यात्मिक होती . मानवता हा आपल्या जगण्याचा पाया होता . छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत होते . तुकोबांच्या अभंगांवर आपली निष्ठा होती . महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील संतपरंपरेचा तुम्हाला सार्थ अभिमान होता . हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा आपल्या वर्तनातून पुढे चालवणाऱ्या तुम्हाला , राग लोभ द्वेष यापेक्षा दया क्षमा शांती चे संगीत अधिक प्रिय होते . त्यामुळेच तर रवींद्र संगीताची निर्मिती झाली .
गुरुदेव ,
चित्रकार , साहित्यिक , संगीतकार , शिक्षणतज्ज्ञ , तत्त्वज्ञ अशा अनेकविध भूमिका जगणाऱ्या आणि त्यातून आदर्श निर्माण करणाऱ्या रविंद्रनाथांनी जागतिक स्तरावर खंडप्राय भारत देशाचे नाव किती उज्ज्वल केले आहे , हे त्या मूर्तीभंजकाना कसे ठाऊक असणार ? त्यांना फक्त उन्मादाची नशाच प्रिय . विध्वंस प्रिय . परंपरा तोडून टाकण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा प्रबळ . त्यांना काय कळणार तुमची प्रतिभा ?
त्यांना केवळ हिंसा आणि हिंसाच प्रिय .
गुरुदेव ,
परंपरेनं चालतं आलेली गुरुकुल शिक्षण पद्धती शांतिनिकेतनच्या स्वरूपात आपण पुन्हा सुरू केली हे त्या अक्षर शत्रूंना कसे कळणार ? आध्यात्मिक परंपरा श्रीनिकेतन च्या रुपात पुन्हा स्थापित केलीत, हे त्या नृशंसाना कसे पचनी पडणार ?
आपले अजरामर साहित्य , त्यामुळे मिळालेला नोबेल पुरस्कार हे त्यांच्या आकलना पलीकडील आहे . भारत आणि बांगला देशासाठी लिहिलेली आणि त्या देशाच्या राज्यघटनेने स्वीकारलेली दोन राष्ट्रगीते लिहिणारे या पृथ्वीवरील आपण असे एकमात्र कवी आहात , हे त्यांना कधीच कळले नसेल का ?
गुरुदेव ,
ज्या पद्धतीने त्यांनी तुमचे शिल्प फोडले , तोडले , अपमानित केले , हे पाहणे ही आमची हतबलता आहे . आमच्या राष्ट्रगीताचा निर्माता छिन्न विच्छिन्न होऊन पडला आहे , हे सत्य आता सर्वांनी स्वीकारले आहे .
गुरुदेव ,
तुमची इच्छा ही कविता या प्रसंगी आठवते आणि धीर देते …
विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही .
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा !
माझ्या दुःखी, व्यथित मनाचं तू सांत्वन कर , अशी माझी अपेक्षा नाही.
दुःखावर मला जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा !
माझ्या मदतीला कुणी आलं नाही , तरी माझी तक्रार नाही .
माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा!
माझी फसवणूक झाली , तर तू मला सावरावंस अशी माझी अपेक्षा नाही .
माझं मन खंबीर रहावं एवढीच माझी अपेक्षा !
माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही .
ते ओझं वाहून नेण्याची शक्ती माझ्यात असावी एवढी माझी अपेक्षा !
सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन , मी तुझा चेहरा ओळखून काढेनच . मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल , तेव्हा , तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये , एवढीच माझी इच्छा !!!
श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
Leave a Reply