” स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक , बुलडोझर लावून उखडून टाकील , असा माणूस जन्माला यायचाय . हिंमत असेल तर हात लावून दाखवा त्यांच्या स्मारकाला …”
तो गरजला .
आणि उत्स्फूर्तपणे जमलेली समोरची लाखोंची गर्दी आकाशाकडे हात फैलावत गरजली .
“वंदे मातरम्!”
तो अजून बोलत होता .
“राष्ट्रीय स्मारकांचा विध्वंस करून , या देशाच्या परंपरेशी , संस्कृतीशी , ज्ञानाशी आणि मातीशी गद्दारी करणाऱ्या देशद्रोह्यांनो , तुमचा मेंदू सडलाय . स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्यासारखे असंख्य क्रांतिकारक या देशात होऊन गेले म्हणून तुम्ही जिवंत आहात . त्यांनी सुखासीन आयुष्याचा त्याग केला म्हणून तुम्ही आज सुखासीन आयुष्य जगत आहात . त्यांची चरित्रं वाचा . त्यांचा त्याग , त्यांनी सोसलेल्या यातना , ऐहिक सुखाकडे पाठ फिरवून अवघ्या देशाचा केलेला विचार , संघर्षमय आयुष्य हे सगळं माहितेय तुम्हाला ? हिंदुत्व , सामाजिक समरसतेसाठी केलेले प्रयत्न , हिंदुस्थानच्या सीमा आणि त्यांचे संरक्षण याबद्दल केलेला विचार , देशाच्या एकात्मतेसाठी मांडलेल्या संकल्पना … यातलं काय माहितेय तुम्हाला ? परदेशातून येणाऱ्या अमाप पैशावर जगणारी तुम्ही बांडगुळे आहात , तुम्हाला काय माहिती सावरकर , काय माहिती देशहित ? तुम्ही सगळे देशाला लागलेली वाळवी आहात . देश आतून पोखरत जाणारी वैचारिक , षंढ वाळवी . भ्रम फैलावणारी वाळवी . संपत चाललेली पण संपता संपता देशाचं , समाजाचं , संस्कृती , किती नुकसान करता येईल याचा विचार करणारी वाळवी . त्यासाठी वापरत असलेल्या शब्दांना लाखो करोडो रुपये मलिदा मिळतोय , याच निर्बुद्ध जगण्यात स्वतःचं सुध्दा नुकसान होतंय हे विसरून गेलेली बधीर वाळवी”. तो क्षणमात्र थांबला .
” देहाकडून देवाकडे जाताना , देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो हा सावरकरांचा विचार लक्षात ठेवायला हवा . तुजसाठी मरण ते जनन , तुजविण जनन ते मरण हे सांगणारे सावरकर माहीत आहेत का तुम्हाला ? महान उद्दिष्टांसाठी केलेले बलिदान व्यर्थ जात नाही , हा केवढा मोठा विचार आहे मी जास्त काही बोलणार नाही , पण एक लक्षात ठेवा हिंदुस्थानशी गद्दारी करण्याचा , द्रोह करण्याचा आणि स्मारक उद्ध्वस्त करून परकीय शक्तींना पाय ठेवायला जागा मिळेल असं काही करण्याचा विचार करू नका . नाहीतर आम्ही आहोत तुमचा यथायोग्य समाचार घ्यायला . स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे शब्दही नीट ध्यानी ठेवा . अगर आप वास्तव में स्वतंत्र रहना चाहते हैं , तो कोई भी आपको गुलाम नही बना सकता , बस , आपको अपनी पहचान को धूमिल नहीं होने देना हैं l ”
तो बोलायचा थांबला आणि लाखोंच्या गर्दीने त्याच्या सुरात सूर मिसळला .
भारावलेली गर्दी उंच स्वरात ललकारली …
वंदे मातरम् l
क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांच्या किरणांना प्रेरणा देण्यासाठी आकाशातील सूर्यसुध्दा प्रखरतेने तळपू लागला .
स्मारकाच्या रक्षणासाठी सगळ्यांची पावले पुढे चालू लागली …
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
Leave a Reply