“येडी बाभळ”
तवा इथंच, फाटक्या खाकी चड्डीत असताळा, दहाबार वाचून सम्पल्यालं पुस्तक कटाळून खाली ठिवलं. अन मग ‘मी’ शौकानं बसल्या जागीच शेत शेत खेळूलालतो. विहीर खंदलती, पान्यासाठी विहिरीत मुतंलतोबी. हिच्याशिवाय कसलंच झाड नसलेल्या आमच्या शेतातल्या या येड्या बाभळीच्याच पानांचं माळवं अन फुलांची गुलछडी लावून आमच्या माळावरंच नादर हिरवा मळा फुलविल्ता. वाडोळच्यान तिथंच बसून चुलत्याच्या बैलाची वाट बघलालेला माझा बाप… काय झालं माहित नाही तिरमिरीत उठला अन मला मरणाचा हाणित म्हनला “मायघाल्या माझी जिंदगी आदुगरंच मातीत गेलीय आता मझ्यासमोर तुझीबी मातीत घाललालायस व्हय रे आक्क्कर माश्या ” इंगळासारक्या लालबुंद झालेल्या त्याच्या डोळ्यात तवा रागाचं पाणी उकळूलालतं.
आन आज मी पुन्हा इथंच हुबा … गावच्याच शाळंत शिक्षण शेवक झालेला, निळीत धुतलेले पांढरे शिप कपडे घालून शाळेत शिकवायची पुस्तकं हातात घिऊन निघायच्या तयारीत. फक्त याबारला माझी इस्त्रीची पांढरी प्यान्ट मळन म्हणून उभा राह्यलोय. अन तवाचसारखं येड्या बाभळीखाली बसून वाडोळच्यान कुणाच्या तरी ट्रॅक्टरची वाट बगलालेला माझा बाप. जिमिनीपासून माझं वाढतं आंतर बघून डोळ्यात दाटलेल्या आर्जवाच्या पाण्याचं दार मोडीत म्हन्लालाय “माय हाय रं हि आपली, टेक खाली काई हुईना! अरे राज्या आपल्या समद्यांचीच माती व्हनाराय एक दिस. हिची सवं ठेव असं हिला आंतर दिऊनुक बाबा”
प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या येऊ घातलेल्या कथासंग्रहातून साभार
‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’
पार पब्लिकेशन्स
खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी असलेल्या सवलतीच्या दरात हे पुस्तक मिळवण्यासाठी इमेल करा paar.publications@gmail.com
Leave a Reply